'शिंदे-फडणवीस सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील, तर अरबी समुद्रात पाहावी..
------------------------------------------------------------------------------------
पुणे;( दै. पंढरी नगरी न्युज) : शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आला आहे. पण आता सोयाबीन कापूस उत्पादक ही मस्ती उतरवल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध दंड थोपटले आहे.पोलिसांनी कितीही दबाव टाकला तरी सरकारशी दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. सरकार जगूही देत नाही आणि मरुही देत नाही. सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील,तर अरबी समुद्रात पाहावी, असा इशाराही तुपकरांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर मुंबईकडे रवाना होण्याअगोदर तुपकरांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सोयाबीन आणि कापसाला भाव नाही दिला तर, मंत्रालयाच्या खिडकीतून अरबी समुद्रात प्रेतं पडलेली सरकारला दिसतील.त्यानंतर तरी सरकारला जाग येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया तुपकरांनी यावेळी दिली.
तुपकर म्हणाले, राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे निगरगट्ट झालं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर श्रेय आम्हाला मिळेल म्हणून हे सरकार जाणीवपूर्वक चर्चेला बोलवत नाही.श्रेय आम्हाला देऊ नका,पण सोयाबीनला साडेआठ हजार रुपये आणि कापसाला १२ हजार रुपये भाव द्या.मात्र,या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. सरकार जगूही देत नाही आणि मरुही देत नाही.सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील,तर अरबी समुद्रात पाहावी, अशा शब्दात तुपकरांनी सरकारला सुनावले.