भीमा सहकारी साखर कारखान्यावर कामगारांचे थकित पगारासाठी जनआक्रोश आंदोलन ◼️ पंचवार्षिक निवडणुकीत भीमा "' कारखाना राज्यात टॉप वन मध्ये आणू म्हणणाऱ्या महाडिकनी सभासद , कामगारांचा विश्वासघात केल्याचा आरोप
◼️ कारखान्याची बिकट अवस्था पाहून संचालक सभासद, कामगारामध्ये तीव्र नाराजी, सत्ताधारी अनेक संचालक चेअरमन महाडिक गटातून बाहेर पडणार असल्याची तीन तालुक्यात चर्चा.
------------------------------------------------------------------------------------
मोहोळ( दै.पंढरी नगरी न्यूज ) मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांची देणी द्या, हंगामी कामगारांचा बेकार भत्ता द्यावा, सन २०१९ पासून १२ टक्के पगारवाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर गेट बंद आंदोलन केले. प्रभारी कार्यकारी संचालक शेख यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे कि, सेवानिवृत्त कामगार व चालू कामगार यांचा भविष्य निर्वाह निधी कारखान्याने संबंधित विभागाकडे भरला नाही, कामगारांचा बेकार भत्ता दिला नाही, पंधरा टक्के पगार वाढ व फरक ही दिला नाही, सन २०२४ पासून दहा टक्के पगार वाढ ही केली नाही. यासह कारखान्याच्या कामगारांची देणी द्या व मगच कंत्राटी कामगार कामावर घ्या, या मागण्यांसह जो पर्यंत कामगारांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांना कारखान्यात कामावर जाऊ न देण्याची भूमिका जुन्या कामगारांनी घेतली आहे. त्यामुळे शुक्रवारी रोजी गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी हनुमंत चव्हाण, दिलीप डोंगरे, संजय चव्हाण, रमेश काळे, सुरेश डोंगरे, संतोष भोसले, पोपट शेळके, राम कृष्ण हराळे, श्रीनिवास बचुटे, रवींद्र शेळके, रामदास शिंदे, विनोद सातपुते, माऊली चव्हाण, अशोक गोंडाळ आदींसह कामगार सभासद शेतकरी मोठ्या संख्येने कारखाना साइटवर उपस्थित होते.