मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील त्या दोन घटनांची पथकाव्दारे चौकशी पूर्ण..

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील त्या दोन घटनांची पथकाव्दारे चौकशी पूर्ण..

---------------------------------------------------------------------------------
         पथकाच्या अहवालाकडे नागरिकांचे लागले लक्ष!
---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) ; मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या दोन घटनांच्या चौकशीसाठी दोन समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. या समितीने मंगळवेढ्यात येवून संपूर्ण सखोल चौकशी केली असून याचा अहवाल सोलापूर येथील सिव्हील सर्जन डॉ.धनंजय पाटील यांना येत्या चार दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली.

या घटनेची सविस्तर हकीकत अशी, मंगळवेढा ग्रामणी रुग्णालयातील महिला वैद्यकीय डॉ.सुलक्षणा जानकर या रुग्णालयात उशीरा आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी व त्यांच्यात वाद झाला होता. तसेच येथे नेमणूकीस असलेले वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम ग्रामीण रुग्णालयात हजर झाल्यापासून सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे,रुग्णांना भेटत नाहीत, रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. या व अनेक तक्रारीमुळे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी चक्क भरचौकात डॉ.गिराम यांचा डिजीटल फलक लावून त्यांच्या कारभाराची लक्तरे जनतेसमोर मांडून पर्दाफाश केला होता. तसेच याबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार ढोबळे यांनी केली होती. या दोन्हीही घटनांची जिल्ह्याचे शल्यचिकिस्तक डॉ.धनंजय पाटील यांनी याची गांभीर्याने दखल घेवून चौकशीसाठी दोन पथके नेमली होती. डॉ.जानकर यांची ११ एप्रिल रोजी वैद्यकीय अधिकारी अकलुजचे डॉ.महेश घुरे व माळशिरसचे वैद्यकीय अधिकारी डॉ.काझी यांनी या घटनेची चौकशी केली. तर डॉ.गिराम यांची शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील व निवासी वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी या पथकाने दि.२४ एप्रिल रोजी यांची चौकशी केली आहे. याचा अहवाल येत्या चार दिवसात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पाटील यांच्याकडे सादर केला जाणार आहे. हे पथक कर्मचार्‍याच्या बाजूने की जनतेच्या बाजूने कौल देणार याबाबत येथील नागरिकांना व रुग्णांना उत्सुक्ता लागून राहिली आहे. सध्याचे ग्रामीण रुग्णालय हे ३० बेडचे असून ५० बेडचा प्रस्ता पाठविला आहे.  येथे रुग्ण रात्रीच्यावेळी अ‍ॅडमीट केल्यानंतर न थांबता ते घरी व अन्यत्र जावून पुन्हा माघारी परत सकाळी येत असल्याने निश्चित रुग्णांची संख्या काऊंट करणे अवघड बनत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र रुग्ण अ‍ॅडमीट असताना रात्रीच्यावेळी बाहेर जातोच कसा? असा सवाल सुज्ञ नागरीकांनी करुन यावर आरोग्य प्रशसनाचे नियंत्रण नाही का? अशी विचारणा होत आहे.

दरम्यान ग्रामीण रुग्णालयात दोन्हीही घडलेल्या घटनांच्या चौकशीसाठी दोन पथके आली होती. त्यांना सविस्तर माहिती वस्तुस्थिती दर्शक दिली आहे. मी शासनाची मंजूरी घेवून खाजगी प्रॅक्टीस करीत असून शासनाच्या सुविधा व भत्ते नाकारले आहेत. ड्यूटी संपल्यानंतर काय काम करायचे हा माझी व्यक्तीगत प्रश्न असल्याचे डॉ.गिराम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

-डॉ.गिराम वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय,मंगळवेढा.