आ.यशवंत माने, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा .

आ.यशवंत माने, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा .

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( विकास सरवळे) : प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या आडेलतट्टू भूमिकेमुळे मोहोळ तालुक्यातील सीना नदी परिसरातील शेतकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून वारंवार मागणी करूनही पाणी वाटप करताना मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सापत्न पणाची भूमिका घेत असल्याने अखेर याचा निषेध म्हणून सोमवार २२ मे रोजी माजी आमदार राजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आ. यशवंत माने आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांचे नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मोर्चा मोहोळ तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली .मोर्चात सहभागी शेतकरी यांनी घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला .या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह आ. यशवंत माने आणि बाळराजे पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .यावेळी बोलताना आ.यशवंत माने म्हणाले, मागील सहा दिवसापूर्वी मोहोळचे तहसीलदार आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सीना नदीद्वारे पाणी सोडून मोहोळ तालुक्यातील बंधारे भरण्याची मागणी केली होती अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल असेही सांगितले होते आणि अखेर ती वेळ आज आल्याने मोर्चा काढला आहे .आम्ही वारंवार जलसंपदा विभागाशी संपर्क साधून सीना नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी केली होती परंतु अधिकाऱ्यांचे डोळे झाक भूमिकेमुळे मोर्चा काढावा लागला आहे शासनाचे धोरणानुसार टेल टू हेड प्रमाणे पाणी वाटप झाले पाहिजे सीना नदीला कॅनॉलचा दर्जा प्राप्त झाला असल्याने नदीवरील शेवटच्या बंधार्‍यापासून धरणापर्यंत असणारे सर्व बंधारे भरण्याची भूमिका जलसंपदा विभागाची असली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार पाणी नदीत सोडल्यानंतर नदी काठावरील शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याची भूमिका योग्य असली तरी मोहोळ मतदार संघाच्या वरील बाजूचे सहा ते सात बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडले असतानाही तेथील वीज पुरवठा खंडित न करता मोहोळ भागातील शेतकऱ्यांची बंधार्यात पाणी नसतानाही वीज खंडित करण्याचे प्रकार जाणून बुजून केले जात आहेत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. यावेळी मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांसह यावेळी जगन्नाथ कोल्हाळ, शिवाजी सोनवणे, बाळासाहेब पाटील, नागेश साठे, बालाजी साठे, श्री. बाळासाहेब भोसले, भारत सुतकर, मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती धनाजी गावडे, उपसभापती प्रशांत बचुटे, मोहोळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजा भाऊ सलगर, विकास (मामा) कोकाटे, दत्ता पवार, शुक्राचार्य हावळे, शशिकांत पाटील, शशिकांत कोल्हाळ, रामराजे कदम,रामदास चवरे, सज्जन चवरे, महेश पवार, शरद सलगर आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील म्हणाले उजनी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. याची पाणी साठवण क्षमता १२२ टीएमसी इतकी आहे आणि हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. असे असतानाही मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे हे दुर्दैव आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी माजी आमदार राजन पाटील माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्वात धरणातील पाण्याचे नियोजन केले जात होते .परंतु अलीकडच्या काळात धरण १०० टक्के भरले असतानाही आपल्या सीना नदी अथवा कॅनॉल ला पाणी दिले जात नाही नदीवरील सर्व बंधारे सध्या कोरडे आहेत पाण्याचे नियोजन करीत असताना अधिकारी लोक मोहोळ तालुक्यावर जाणून बुजून अन्याय करीत आहेत संबंधित अधिकाऱ्यांना पाण्यासाठी जाब विचारला असता पाणी सोलापूरला सोडायचे कारण सांगतात माझ्या मोहोळ तालुक्यातील जनतेचाही तितकाच अधिकार सिना नदीवरील पाण्यावर आहे आज या सीना नदीवरील अनगर, भोपले, आष्टे, शिरापूर सारखे बंधारे कोरडे पडले आहेत यामुळे मोठ्या कष्टाने जोपासलेली शेतकर्यांची पिके करपू लागली आहेत. नदी पात्रातुन सोडण्यात आलेले पाणी खरे तर टेल टू हेड या भुमिकेने दिले पाहिजे परंतु मोहोळ तालुक्यात नदीमध्ये पाणी नसताना विज वितरणचे अधिकारी या ठिकाणच्या शेतकर्यांची वीज तोडतात परंतु ज्या वरील भागात पाणी आहे त्या ठिकाणी अखंडीत वीज पुरवठा सुरू ठेवला जात आहे .या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष वेधुन नदीवरील वरच्या बाजूचे सर्व बंधाऱ्याची दारे उघडी करून मोहोळ तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी या माध्यमातून पाटील यांनी केली.

प्रशासनातील अधिकारी जनतेची कामे करताना दुजा भावाची भूमिका घेत असतील आणि एकाच खुर्चीवर चार ते पाच वर्ष राहत असतील तर शासनाने योग्य भूमिका घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अशा जलसंपदा विभाग आणि वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदार यशवंत माने यांनी केली.

हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आ.यशवंत माने आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी मोहोळ तहसील आवारात ठिय्या  मांडल्यानंतर प्रशासन नमले आणि संबंधित जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि तहसीलदार यांनी शेतकऱ्यांसमोर येऊन आम्ही आजच्या आज पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन सीना नदीवरील वरच्या बंधाऱ्याची दारे उघडून मोहोळ तालुक्यातील सर्व बंधारे भरून देऊ असे आश्वासन दिले.