अमर पुस्तके आपणास ज्ञान आणि सुसंस्कारांनी महान बनवतात.-प्रा. मुकुंद वलेकर
-------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज) : अमर पुस्तके आपणास ज्ञान आणि सुसंस्कारांनी महान बनवतात. आज सोशल मीडियाच्या जमान्यात पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी मोबाईलपेक्षा ग्रंथालयातल्या पुस्तकांशी मैत्री करायला हवी.बाजारात आपणास नवे जग दिसते तसेच वाचनालयातही आपणास ज्ञान-विज्ञानाचे नवे जग पाहता येते. मंदिराप्रमाणे वाचनालयात अबालवृध्दांनी दिवसातून किमान एकदातरी फेरफटका मारायला हवा. असे विचार कवी प्रा. मुकुंद वलेकर यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात 'बालकुमार ज्ञानकोपरा' या उपक्रमातंर्गत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महादेव निंबाळकर सर हे होते. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य विठ्ठल वलेकर, नाटककार व अभिनेते एन.के. सुतार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. मुकुंद वलेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शालेय मुलांनी सुट्टीचा काळ वाचनालयात जाऊन पुस्तके वाचन्यात घालवावा. सुंदर पुस्तके ज्ञानाबरोबर जगण्याची प्रेरणा आणि बळ देतात. थोर मोठ्या लोकांची आत्मचरित्रे मुलांनी शालेय जीवनात वाचावी. पालकांनी मुलांच्या अवांतर वाचनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. अध्यक्षीय भाषणात महादेव निंबाळकर सर म्हणाले, मुलांनी सुट्टीचा आनंद जरूर घ्यावा परंतु वेळात वेळ काढून चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. उदनवाडीतील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय हे ज्ञानाचे भांडार असून वाचनासाठी सर्व सोयीनी स्वतंत्र अभ्यासिका आहे, ही खूप समाधानाची बाब आहे. पालकांनी ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचनाचा आदर्श मुलांसमोर ठेवला तर मुले नक्कीच पुन्हा पुस्तके वाचनाकडे वळतील.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल वलेकर यांनी केले.प्रा. मुकुंद वलेकर यांच्या हस्ते बालकुमार ज्ञान कोपऱ्याची फीत कापून उद् घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार ग्रंथपाल विजय वलेकर यांनी केले. यावेळी उपस्थित बालकुमारांना खाऊवाटप करण्यात आले. कार्यक्रमास शालेय मुले, पालक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.