राष्ट्रसंत तुकडोजींची जयंती 'ग्रामजयंती' म्हणून साजरी व्हावी - अँड. दत्तात्रय खडतरे

राष्ट्रसंत तुकडोजींची जयंती 'ग्रामजयंती' म्हणून साजरी व्हावी - अँड. दत्तात्रय खडतरे

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती स्व. संजय - सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय कृष्णनगर, मंगळवेढा येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अँड दत्तात्रय खडतरे तर अध्यक्ष म्हणून भीमराव घुले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले. मान्यवरांच्या  हस्ते राष्ट्रसंत तुकडोजीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत ग्रंथभेट देऊन करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे गेल्या शतकातील महान प्रबोधनकार होते. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयी त्यांनी सुचविलेले उपाय अतिशय परिणामकारक होते. ग्राम सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात असे त्याचे मत होते. राष्ट्रसंताच्या प्रबोधनाच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्यांची जयंती ही, 'ग्रामजयंती' म्हणून देशभरात साजरी व्हावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँड दत्तात्रय खडतरे यांनी केले.

याप्रसंगी वाचनालयाच्या परिसरातील एस.टी. डेपो मंगळवेढा मधील लेखपाल अतुल खुपसे यांची बदली झाल्यामुळे त्यांचा  सपरिवार सत्कार करण्यात आला. आंधळगाव येथील परिवहन कर्मचारी हिरालाल शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वैष्णवी जाधव मॅडम यांनी समयोचित भाषण केले. अतुल खुपसे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव घुले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी गौरवोदगार काढताना म्हटले की महाराजांनी हातात खंजिरी घेऊन भजन करत देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक आणि  राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. स्वातंत्र्यचळवळीत  भाग घेतला म्हणून त्यांनी कारावासही भोगला. त्यांनी मराठी व हिंदी भाषामध्ये काव्यरचना केली. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहिशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. ग्रामगीता हा त्यांचा ग्रामविकासावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ग्रामगीतेचे पारायण घरोघरी व्हायला हवे असे मत घुले यांनी मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गायकवाड यांनी व आभार प्रदर्शन पांडूरंग गुंगे यांनी मानले.

कार्यक्रमास रामचंद्र हेंबाडे, रामचंद्र करेली, माजी नगरसेवक महादेव जिरगे, हिरालाल शेख, मालचंद्र जाधव, पांडुरंग गुंगे, संभाजी बिग्रेडच्या महिला अध्यक्षा इंदुमती जाधव, विद्या घुले, लक्ष्मी करेली, वैष्णवी जाधव, सृफी मर्दा, भाभी इनामदार, ज्योती खुपसे, आरती खुपसे, प्रसाद खूपसे, ऋषिकेश गायकवाड, संकेत सातपुते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.