सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दिव्यांगांच्या ५ टक्के राखीव निधी त्वरित खर्च करावा; ◼️ वैजिनाथ धेडे यांची मागणी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी दिव्यांगांच्या ५ टक्के राखीव निधी त्वरित खर्च करावा;   ◼️ वैजिनाथ धेडे यांची मागणी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर, (दै पंढरी नगरी न्यूज ): सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिव्यांगांच्या हक्काचा ५ टक्के राखीव निधी तातडीने खर्च करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजिनाथ औदुंबर धेडे (कातेवाडी, ता. मोहोळ) यांनी केलीआहे. बुधवारी सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला इशारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या हक्काचा निधी वाटप अथवा खर्च न केल्याने दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

धेडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी नोंदवली आहे. त्यांनी मागणी केली की, ग्रामपंचायतींनी दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन, ग्रामसभेत चर्चा करून, आवश्यक साहित्य वाटपासाठी १५ ऑगस्ट २०२५, स्वातंत्र्यदिनी हा निधी वितरित करावा. यामुळे दिव्यांगांना त्यांचे हक्काचे स्वातंत्र्य मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. उपोषणाचा इशारा धेडे यांनी स्पष्ट केले की, जर १५ ऑगस्टपर्यंत निधी वाटपाची कार्यवाही पूर्ण झाली नाही, तर ते स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसतील. त्यांनी प्रशासनाला वेळेत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.