श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीच्या मोबाईल लॉकरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीच्या मोबाईल लॉकरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरक्षिततेच्या व मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने मोबाईल बंदी करून मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल लॉकर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. 

मंदिर समितीने 01 जानेवारी, 2020 पासून मंदिरात मोबाईल बंदी लागू केली आहे. त्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पश्चिम द्वार, श्री रेणुका माता मंदिर, दर्शन मंडप पूर्व गेट इत्यादी चार ठिकाणी मोबाईल लॉकर सुरू केलेली आहे. प्रति मोबाईलसाठी रुपये 5 देणगीमूल्य आकारण्यात येते. या मोबाईल लॉकरचा पाचवा वर्धापन दिन मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते दिनांक 2 जानेवारी रोजी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे मोबाईल लॉकरचे पूजन करून व केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा, लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी, विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहायक विभाग प्रमुख रघुनाथ शिंदे तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

मोबाईल माणसाच्या जीवनाचा एक महत्वाचा व अविभाज्य भाग बनला असून, मोबाईल मुळे माणसे एकमेकांशी जोडली आहे व जग जवळ केले आहे. मोबाइल ही अशी वस्तू आहे की, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही. त्याच रूपांतर गरजेमध्ये झाले आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मोबाइल ही सगळ्यांसाठी महत्त्वाची व जीवनावश्यक बाब झाली आहे. आताच्या डिजिटल युगात अशी जीवनावश्यक वस्तू माणूस थोडा वेळ ही इतर कोणाच्याही हातात आपला देत नाही, यासाठी तो हजारो रुपये खर्च करत आहे आणि हा मोबाईल मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी श्रीचा भक्त मंदिर समितीच्या मोबाईल लॉकरमध्ये जमा करत आहे. त्यासाठी मंदिर समिती प्रती मोबाईल फक्त 5 रुपये देणगी मूल्य आकारात असून, तो दर्शन करून आल्यानंतर त्यास पुन्हा देण्यात येतो. आतापर्यंत एकाही भाविकाचा मोबाईल गहाळ किंवा बदलला गेलेला नाही इतके काळजीपूर्वक कर्मचाऱ्याकडून भाविकांची सेवा होत असल्याबद्दल व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी आपल्या मनोगतात कौतुक करून अभिनंदन केले.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2024 या दरम्यान सर्व मोबाईल लॉकर मधून 43 लाख 28 हजार 785 रुपये इतके उत्पन्न मिळाले असून, सुमारे 8 लाख 65 हजार 757 इतक्या भाविकांनी वर्षभरात मोबाईल जमा केल्याचे दिसून येत आहे. सर्व मोबाईल लॉकरमध्ये दोन शिफ्ट मध्ये एकूण 15 कर्मचारी कार्यरत आहेत. या मोबाईल लॉकरमध्ये ट्रीप्लिकेट पावती पुस्तक असून, लवकरच या मोबाईल लॉकर चे आधुनिकरण करून संगणक प्रणाली विकसित करण्याचा मंदिर समितीचा मानस असून मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचे चांगले सहकार्य व मार्गदर्शन मिळत असल्याचे श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.