राजू शेट्टींना झटका तर ठाकरेंना बळ;पंढरपूरमधील रणजीत बागल यांचा शिवसेनेत प्रवेश हाती बांधले शिवबंधन
-----------------------------------------------------------------------------------
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट ,रिकामे टेकड्यांचा संघटनेत उपद्रव
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै पंढरी नगरी न्यूज) : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गट, मनसे, शिंदे गट अशा सर्वच राजकीय पक्षात इन्कमिंग व आऊटगोईंगला उधाण आले आहे.याचाच फटका आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील बसला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बागल यांचा राजीनामा हा माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चळवळीतला आक्रमक चेहरा म्हणून रणजित बागल यांची ओळख आहे. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनं, मोर्चा यांद्वारे आवाज उठविला होता. मात्र, आता बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उध्दव ठाकरे गटात प्रवेश केलाआहे.
रणजित बागल यांनी राजीनामा देताना काय म्हणाले?
बागल राजीनामा पत्रात म्हणाले, आदरणीयसाहेब ,मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेले सात ते आठ वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यानंतर २०२० साली आपण मला स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता अशी महत्वपूर्ण जबाबदारी दिली. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आपण दिलेली संधी म्हणजे कधीही न फिटणारे उपकार आहेत.
परंतू, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकीय परिस्थितीने मन अस्वस्थ झाले. बदलत्या राजकीय परिस्थितीत काही निर्णय घ्यावे लागतील. यासाठी मी आपल्या पक्षाच्या व संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदाचा व प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्रात नमुद केलं आहे.
ठाकरे गटाला मिळणार ताकद
रणजित बागल यांनी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकल्यानंतर बागल हे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला असल्याची माहिती दिली आहे. रणजित बागल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. बागल यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे पंढरपूर तालुक्यात पक्षाला मोठी ताकद मिळणणार आहे.