सोलापूरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे - पाटील पंढरपुरातील वाळू चोरीबाबत काय निर्णय घेणार? की महसूल विभागाला अभय देणार? नागरिकातून चर्चा

सोलापूरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे - पाटील पंढरपुरातील वाळू चोरीबाबत काय निर्णय घेणार? की महसूल विभागाला अभय देणार?      नागरिकातून चर्चा

-----------------------------------------------------------------------------------
महसूल मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे - पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर
-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे -पाटील हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार असून ते विविध ठिकाणी शासकीय आढावा बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत पंढरपूर शहर व तालुक्यातील नदीच्या पत्रातील वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून दिवसेंदिवस या वाळू तस्करी मध्ये काही केल्याने घट ऐवजी वाढच होत असल्याचे पोलीस करीत असलेल्या कारवाईंमुळे स्पष्ट होत आहे याकडे सोलापूरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंढरपूर महसूल विभागाबाबत काय कारवाई करणार याकडे शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महसूल मंत्री प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्ह्यातील नदीच्या पत्रातील वाळू माफियाकडून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करीत होत असल्याचे माहिती काही सामाजिक संघटनांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या कानावर घातली होती त्यावेळी जिल्ह्यातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांना जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून यापुढे वाळूची तस्करी होणार नसल्याचे स्पष्ट सांगत वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू माफिया वर मोठे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले होते तसेच त्या त्या तालुक्यातील महसूल विभागातील अधिकारी ,कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला होता परंतु महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्याच्या या डरकाळीकडे साफ दुर्लक्ष करून वाळू माफियाना एक प्रकारे अभय देऊन त्यांच्या आदेशाला पंढरपूर महसूल विभागाने केराची टोपली दाखवली आहे .

सरकोली, गोपाळपूर तावशी तरटगांव(कासे)माणनदी,चळे ,शिरढोण ,इसबावी ,आंबे ,तसेच पंढरपूर शहर भीमा नदीच्या पात्रातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून महसूल  आशीर्वादाने दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. वाळू तस्करीकडे संबंधित विभागाची डोळेझाक सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. कोणालाही न जुमानता ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू माफियांकडून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे.

याबाबत पंढरपूर शहरातील वाल्मिकी सामाजिक संघटनेचे नेते गणेश अंकुशराव तसेच कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी यांनीही पंढरपूर शहरात व ग्रामीण मध्ये होणाऱ्या वाळू चोरी बाबत वारंवार निवेदने आंदोलने केली आहेत .वाळू चोरी होत असलेल्या ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने गेल्या महिन्यात पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांना आपला जीव गमावा लागला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना पोलीस यंत्रणा मात्र अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सतत कारवाया करीत आहे. महसूल विभाग मात्र वाळू तस्करी कडे कानाडोळा करीत आहे. त्यांना एक प्रकारचा आशीर्वादच देत असल्याचे यावरून दिसून येते त्यामुळे , अनवली, राजंणी. कासेगाव मार्गे शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचे नंबर प्लेट काढून टाकण्यात आलेले आहेत. अवैध वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिलेली नाही.

गाव - खेड्यांमधून भरधाव धावणाऱ्या ट्रॅक्टरांना कोणी हटकल्यास मुजोरीची भाषा वापरतात. पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली तर आम्ही हप्ते देतो. त्यामुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी मुजोरीची भाषा वापरतात. सुरू असलेल्या या वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.

वाळू तस्करी जोमात असताना महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा कोमात गेल्याचे तस्करांना आळा घालणारा तरी कोण? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या तस्करांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आवर घालावा, अशी मागणी सरकोली व गोपाळपूर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याचे मानून वाळू चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकात व अधिकाऱ्यांच्या समावेश देखील करण्यात आला होता. वाळूसाठ्याचा लिलाव झालेला नसल्याने वाळूमाफियांनी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू केला आहे.

अवैध वाळूच्या ओव्हरलोड ट्रॅक्टरमुळे तालुक्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. वाळूमाफियांना अनेकदा अधिकाऱ्यांवर ही हल्ले केलेले आहेत यामुळे जिल्ह्यात वाळूमाफियांची दहशत आहे. महसूलचा वाळूमाफिया वचक नसल्याचे पाहावयास मिळत आहे. तरी शासकीय आढावा बैठकीसाठी सोलापूर येथे येणारे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे पंढरपुरातील वाळू चोरी बाबत काय? निर्णय घेणार याकडे संबंधित सामाजिक संघटना नागरिक यांचे लक्ष लागले आहे.