डॉ.विठ्ठल जाधव यांचा राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने सन्मानीत

डॉ.विठ्ठल जाधव यांचा राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने सन्मानीत

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील डॉ. विठ्ठल शिवाजी जाधव यांचा स्व. हरीश्चंद्र फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या "राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. रविवार दिनांक  २४  डिसेंबर रोजी सोलापूर येथील फडकुले सभागृहात हा पुरस्कार त्यांना पुणे येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जातीय प्रमाणपत्र पडताळणी अधिकारी सचिन कवले हे होते .

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. घरची गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. कॉलेजचे शिक्षण घेत असताना पंढरपूर येथील डॉ. मुकुल भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये ते कित्तेक दिवस डॉ. भोसले यांच्यासाठी सेवक म्हणून काम करत होते. शिक्षण घेत-घेत फारच जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय आष्टा येथे प्रवेश मिळवला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण आण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा येथे झाले.

अगदी लहानपणापासून गावातील बरीच शिक्षक मंडळी याचे साक्षीदार आहेत. डॉक्टर झाल्यापासून ते आजही परिसरातील अंध- अपंग व मूकबधिर व्यक्ती, शालेय गरीब विद्यार्थी, माजी सैनिक आणि ज्यांना मुलगा नाही असे वृद्ध यांना मोफत सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. व्यायाम आणि खेळ त्यांच्या खूप आवडीचे क्षेत्र. साधारण १९९८ ते २००७ या काळातील आपल्या गावातील आमच्या नवजीवन क्रिकेट संघात एक उत्कृष्ट बॉलर म्हणून ते ओळखले जायचे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी अगदी मनापासून चांगली सेवा बजावली आहे .त्यांचा राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर मुद्रांक शुल्क अधिकारी महाराष्ट्र शासन, महेश देवकर, सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सीमा  पाटील, पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे, संगीता गुरव, हरिश्चंद्र फाउंडेशन चे अध्यक्ष कदम ,कृष्णा गायकवाड सर ,वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, पत्रकार गौतम जाधव,किशोर जाधव, पीपीआर न्यूजचे संपादक तानाजी जाधव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अध्यक्ष चंद्रदीपक भालेकर,  शिवसेनेचे माजी उप तालुकाप्रमुख अरुण जाधव धनश्री मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी शाखा अधिकारी नितीन जगताप, पंढरपूर रयत शिक्षक पतसंस्थेचे सदस्य किशोर जाधव, प्रगतशील बागायतदार बलभीम जाधव बाळासाहेब कुलकर्णी सर इत्यादी उपस्थित होते.