माजी आमदार दिलीप माने यांना भाजपा प्रवेशाचे अवतनं..
_________________________________________________
सोलापूर;(प्रतिनिधी) : माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझा अजून पक्षच नक्की नाही. पण, मानेसाहेबांना मी सांगेन की राजकारणात आपलं अस्तित्व महत्वाचं असतं.
कुणाचं कितीही गणित असलं तरी राजकारणात निवडणून येणारं गणितचं आपण मांडायचं असतं. आता तुम्ही काही करा; पण निवडून येणारं गणितच मांडा. कुठं (कोणत्याही पक्षात) मांडायचं तिथं मांडा; पण निवडून येणारं गणितं मांडा. आपण कोठूनही या; मात्र विधानसभेत या. तशी गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला आम्ही कुठं कमी पडणार नाही, अशा शब्दांत माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर मिल्स या साखर काखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ भाजप आमदार जयुकमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते सदाशिवभाऊ पाटील यांच्या हस्ते आज (ता. ११ ऑक्टोबर) मोळी टाकून करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार दिलीप माने यांनी 'सदाशिवभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर जयकुमार गोरे हे भाजपमध्ये आहेत. माझा अजून काय पत्ता नाही. बघू पुढे. एकदा घाई करून चूक झाली आहे,' असे वक्तव्य करून २०१९ मध्ये शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकला, अशी कबुली दिली. त्यावर बोलताना आमदार गोरे यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
जयकुमार गोरे म्हणाले की, मानेसाहेब राजकारणात गडबड, घोटाळे होत असतात. पण, धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही. अपयश येतं, पण त्याचा फार विचार करायचा नाही. जेव्हा उठून पुन्हा कामाला लागतो, तेव्हा खात्रीनं आपण येत असतो. मी भाजपमध्ये आहे, त्यामुळे मी तुम्हाला भाजप प्रवेशाचं निमंत्रणच देईन, माझी काही अडचण नाही. पण, मी काय ते सांगायला येथे आलो नाही. मी भाजपमध्ये काम करतो, तेव्हा मला मनापासून आनंद होतो. खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव मला भाजपमध्ये आला आहे.
मानेसाहेब जाता जाता एवढंच सांगेन की कारखाना, शिक्षण संस्था चांगल्या चालल्या आहेत. पण माझी एक इच्छा आहे, मी २०२४ मध्ये पुन्हा विधानसभेत जाईन, तेव्हा मानेसाहेब तुम्ही माझ्यासोबत असावेत. ती इच्छा कशी पूर्ण करायची, हे मला इथली काहीच कल्पना नाही. त्यामुळे मी बाकीच्या विषयावर काही बोलणार नाही. पण, आपण कोठूनही या; मात्र विधानसभेत या. तशी गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला, आम्ही कुठं कमी पडणार नाही, असा शब्दही आमदार गोरे यांनी दिलीप माने यांना दिला.
गोरे म्हणाले की काखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला सहजासहजी मला कोणी बोलावत नाही. जेवढे साखर कारखानदार आहेत, त्यांचं आणि माझं जमत नाही. पण माजी आमदार दिलीप माने आणि आमचं मित्रत्वाचे, स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी मला बोलावले. वास्तविक सिद्धनाथ साखर कारखाना उभा राहत असताना आम्ही दोघंही आमदार होतो. कारखान्याचं काम अंतिम टप्प्यात आलं होतं, पहिला हंगाम घेण्याची परिस्थिती होती. कारखाना चालू करण्यासाठी दिलीप माने यांची असलेली धडपड, मेहनत, पळापळ या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे. प्रचंड मेहनत करून माने यांनी हा कारखाना उभा केला आहे. त्या कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाला मला येता आले.
कार्यक्रमाला यायला आज मला वेळ झाला. आम्हा राजकारण्यांचा एक विषय असतो. कार्यक्रमाला उशिरा यायचं आणि माफी मागायची, ही पद्धतीआम्हाला पूर्वपासून दिलेली आहे. आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. पत्रकार बंधू, टीव्हीवाले आमच्यावर काय काय लिहित असतात. पण माझं या सर्वांना सांगणं आहे की एकदा आमदार होऊन बघा, एकदा नेता होऊन बघा आणि त्यातील सुख एकदा तपासा म्हणजे लक्षात येईल नेमकं काय असतं. लांबून बघायला बरं वाटतं. आमदार आहे, त्या पाठीशी माणसं आहेत. पण वेदना आणि यातना बघितल्या तर आपण त्यामध्ये कधी जाऊ नये, अशी भावना निर्माण होते, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, दिलीप माने यांनी फोनवरून मला कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंला येण्याचे निमंत्रण दिले. मानेसाहेबांचा फोन आल्यावर वेळ आणि कार्यक्रम कधी आहे, हेही विचारले नाही. मीही येतो म्हणून सांगितले. पण कार्यक्रमाला येत असताना माझ्या मनात प्रश्न होता की मानेसाहेब नेमकं कुठल्या पक्षात आहेत, हे माहिती नव्हतं आणि भारतीय जनता पक्षाचा इथला नेता कोण आहे, हेही मला माहिती नव्हते. पण एकदा मित्राला शब्द दिल्यानंतर पक्ष-पार्टीच्या पुढे आपले जे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत, त्या ऋणानुबंधाच्या गाठी अशाच मजबूत ठेवणे, हेच आपल्या आयुष्याचा ठेवा असतो. तो ठेवा जपण्याच्या दृष्टीने आज माने साहेबांच्या कार्यक्रमाला आलो आहे. येथे आल्यानंतर मनापासून आनंद झाला की आपला एक सहकारी दोन दोन साखर कारखाने चालवतो.
काँग्रेस पक्षात असताना मी, दिलीप माने आणि सदाशिवभाऊ पाटील आम्ही सर्वच जण पतंगराव कदम यांचे नेतृत्व मानायचो. त्यांच्याकडे बघत बघत आम्ही राजकारण करायचो. ते नेहमी म्हणायचे की माझा एक वाघ आहे, सोलापुरात. गेलं की घ्यायलो येतो. फक्त खूप ताकदीचा नेता आहे, असे ते दिलीप माने यांचे कौतुक करायचे, अशी आठवणही गोरे यांनी सांगितली.