स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विविध प्रश्नासाठी दि. २५ रोजी भटुंबरे येथील चौकात रास्ता रोको

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विविध प्रश्नासाठी दि. २५ रोजी भटुंबरे येथील चौकात रास्ता रोको

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर पंढरी नगरी न्यूज पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावरील असणाऱ्या शेतकऱ्यांचा शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून  महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून शेतकऱ्यांना कोणततीही पूर्वकल्पना न देता विद्युत पुरवठा अचानक फक्त दोन तास सुरू ठेवल्याने शेती पिकाचे व जनावराचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने या प्रश्नाबाबत पंढरपूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी भटुंबरे येथील अहिल्या चौकात हजारो शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांनी पंढरपूर तहसीलदार यांच्याकडे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सचिन आटकळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ,गुरसाळे व पंढरपूर बंधार्‍यावर कौठाळी, गुरसाळे, शिरढोण ,चिंचोली - भोसे, भटुंबरे, इसबावी येथील हजारो शेतकरी शेतीवर आपली उपजीविका करीत आहेत त्यातच आत्ताच निसर्गाचे उन्हाचे चटके बसत असतानाच येथील विद्युत मंडळाने शेतकऱ्यास कोणतेही पूर्वकल्पना न देताच विद्युत पुरवठा दोन तास खंडित करून चटके देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शेती व जनावराचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे . सध्या उजनी धरणातून भीमा नदीत पाणी मुबलक प्रमाणात सोडण्यात आले आहे. याचा शेतकऱ्यांना कसलाही फायदा होत नाही ,परंतु विद्युत मंडळाने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. तरी संबंधित विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर गुरसाळे बंधाऱ्यावरील विद्युत पुरवठा आठ तास पूर्ववत करावा व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी ही कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांनी केली आहे .

तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावे .इत्यादी मागण्या लेखी निवेदनाद्वारे दिल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या मान्य न केल्यास गुरुवार दि. 25 रोजी सकाळी 11 वा. पंढरपूर- टेंभुर्णी मार्गावरील भटुंबरे चौकात हजारो शेतकऱ्या समवेत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा सचिन आटकळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. यावेळी निवेदन देताना  रमेश पवार, सुहास पवार, सुदाम पवार ,रामचंद्र कारंडे, सचिन घोडके, पंकज कनेरकर, अरुण नागटिळक इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.