बार्शी शिवाजी शिक्षण शास्त्र कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
******************************************************
बार्शी( पंढरी नगरी न्युज) श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि अग्नी कुल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एल .आय राठोड तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एस .गोरे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर बी. एड विभाग प्रमुख तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ .व्ही .पी शिखरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एम .व्ही मते, डॉ पी. ए पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कर्मवीर जयंतीनिमित्त सांस्कृतिक स्पर्धेतील संदीप शिंदे, अंकिता धस व संध्याराणी साळुंखे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अंजनी गिराम, आशुतोष कानडे व रेणुका रानमाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तुत्वावर आधारित मनोगत व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. एल आय राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य विशद केले. त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे महिलांसाठीचे कार्य महान आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाची प्रभावी चळवळ उभी केली. स्त्रियांना मान- सन्मान मिळवून दिला. स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले.
अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ. एस. एस .गोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा देण्याचे कार्य सावित्रीबाई यांनी केले. समाजातील अनिष्ट प्रथा व परंपरा नष्ट केल्या. स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख करून दिली. आजच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत. उच्च शिक्षणात देखील महिलांचा सहभाग अधिकतम असायला हवा असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नाली सोनवणे यांनी केले. कोमल नहार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. उपस्थितांचे आभार धीरज नलगे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री भोसले यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक व बी .एड प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.