बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये स्वच्छता सप्ताह उत्साहात साजरा...

बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये स्वच्छता सप्ताह उत्साहात साजरा...

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला. या स्वच्छता सप्ताहाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेच्या मार्गदर्शक सूचनानुसार कॉलेज परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. २७ सप्टेंबर २०२४ रोजी स्वच्छता सप्ताहाचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एस गोरे यांच्या उपस्थितीत झाले. २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत कॉलेज परिसरातील क्रीडांगणे, मैदान, वर्गखोल्या, कार्यालय, कॉलेज परिसर, टेरेस, मुलींचे वसतिगृह इ. बाबतचे स्वच्छतेचे नियोजन व कार्यवाही करण्यात आली. तसेच कॉलेज परिसरातील बाग, वृक्षसंवर्धन, वृक्षाची निगा व काळजी इत्यादी बाबतचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले. स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. सर्वांनी स्वच्छतेचे मूल्य अंगीकारून रुजविले पाहिजे. स्वच्छ परिसर निरोगी आरोग्य राखतो. स्वच्छतेमुळे आत्मविश्वास वाढतो. स्वच्छता ही उत्साहाने नाविन्यपूर्ण कार्य करण्यास प्रेरणा देते. स्वच्छतेमुळेच मानवी मन समृद्ध होते. स्वच्छता हा परिसराचा आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी विशद केले. स्वच्छता सप्ताह उपक्रमामध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस .एस गोरे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी सहभागी झाले होते.