कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी मध्ये जागतिक महिला दिन साजरा....

कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी मध्ये जागतिक महिला दिन साजरा....

------------------------------------------------------------------------------------

बार्शी ( दैनिक, पंढरी नगरी न्यूज) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. क्षमा बकाल व पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्योती पंढरे या उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे होते. यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ. सी एस मोरे, बी एड विभाग प्रमुख डॉ .व्ही पी शिखरे, बी पी एड विभाग प्रमुख डॉ. ए जी कांबळे, डॉ. एम एस डिसले, डॉ .आर ए फुरडे,प्रा. स्मिता सुरवसे, डॉ .एम व्ही मते, डॉ. पी ए पाटील, प्रा. पी पी नरळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला "तू आहेस ना" हे महिला सन्मान गीत सादर करण्यात आले. यावेळी सराव पाठ व शालेय आंतरवासिता अहवाल प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुदर्शन तनपुरे, सुचिता गायकवाड व रणजित भालेराव यांनी शालेय आंतरवासिता अहवाल सादरीकरण केले.

प्रमुख पाहुणे डॉ. क्षमा बकाल यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, महिलांचा आदर व सन्मान केला पाहिजे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विषयक जनजागृती महिलांमध्ये झाली पाहिजे. महिलांनी आरोग्याच्या समस्या न घाबरता सांगितल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्योती पांढरे यांनी महिलांच्या सुरक्षितता विषयी माहिती दिली. महिलांनी अन्याय व अत्याचार सहन करू नयेत. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे. यासाठी महिलांना कायद्यविषयी माहिती असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ .एस एस गोरे यांनी जागतिक महिला दिन याविषयी सविस्तर माहिती विशद केली.

ते म्हणाले, स्त्री-पुरुष समानता मूल्य रुजवणूक झाली पाहिजे. महिलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी जागरूक असले पाहिजे. मुलगा- मुलगी भेदभाव करू नयेत. कुटुंबात व समाजात वावरताना महिलांना सन्मान द्या, महिलांना पोलीस स्टेशनची पायरी चढू देऊ नका, सामाजिक न्यायाने विविध क्षेत्रात सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या, मुलगा व मुलगी यांना समान न्यायाने वागणूक द्या, आजच्या विज्ञान युगात महिलांच्या कौशल्याचे व ज्ञानाचा वापर करण्याची संधी उपलब्ध करून द्या, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घ्यावी, महिलांचा आत्मसन्मान राखा त्यामुळे आपला समाज मोठी प्रगती करू शकेल,असे त्यांनी सांगितले. आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांचा आत्मसन्मान राखला जावा , महिलांचा असे आपणास असे संकल्प करूया असे त्यांनी आवाहन केले.

उपस्थितांचे आभार डॉ .एम व्ही मते यांनी मानले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एम एस डिसले यांनी करून दिला. रेश्मा जगदाळे व ऋतुजा मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व बी .एड प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.