विठ्ठल - रूक्मिणीमातेच्या ऑनलाईन पुजा नोंदणीला भाविकांचा प्रतिसाद - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके श्री. विठ्ठलाच्या नित्यपुजेची माहे डिसेंबर पर्यंत संपूर्ण नोंदणी. महाराष्ट्रसह आसाम, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून पूजा नोंदणी.

विठ्ठल - रूक्मिणीमातेच्या ऑनलाईन पुजा नोंदणीला भाविकांचा प्रतिसाद  - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके   श्री. विठ्ठलाच्या नित्यपुजेची माहे डिसेंबर पर्यंत संपूर्ण नोंदणी.  महाराष्ट्रसह आसाम, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून पूजा नोंदणी.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या सर्व पूजा  श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून, दि.1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात आली होती. या सुविधेला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात  दि. 7 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये उपलब्ध झालेल्या पुजेमधून विठ्ठलाच्या नित्यपुजेची संपूर्ण नोंदणी झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे, यावरून सदर प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबवण्यात आली आहे. याशिवाय, रूक्मिणीमातेच्या 17 नित्यपुजा,  88 पाद्यपुजा व 30 भाविकांनी तुळशीपूजा  नोंदणी केल्या आहेत.

या ऑनलाईन पध्दतीच्या नोंदणीचा शुभारंभ दि. 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांच्या शुभहस्ते व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ, राजेंद्र घागरे, बलभिम पावले व सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
भाविकांना https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पूजेची नोंदणी  करता येईल. ऑनलाईन पध्दतीने पुजा उपलब्ध करून दिल्यामुळे भाविकांना घरबसल्या पुजा नोंदणी करता येत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत असल्याचे व्यवस्थापक मनेाज श्रोत्री यांनी सांगीतले.