प्रणिती शिंदेंची डोकेदुखी वाढली ; सोलापुर लोकसभेतून वंचित उमेदवार देणार ?

प्रणिती शिंदेंची डोकेदुखी वाढली ; सोलापुर लोकसभेतून वंचित उमेदवार देणार ?

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (पंढरी नगरी न्यूज) लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात काही मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. आज वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत मोठं विधान केले आहे.परिणामी याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता सोलापुर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत म्हणून मैत्रीपुर्ण लढत अशी संकल्पना समोर आणली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे वंचित आता सोलापुरातून देखील उमेदवार देणार असल्याची माहिती समोर येत आहे. वंचितकडून सोलापुरात आठ ते दहा उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. उमेदवारांची घोषणा येत्या काही दिवसात होईल, अशीही सुत्रांनी माहिती दिली आहे.

सोलापुर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच आमदार राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. हे दोन्ही उमेदवार तरूण असून त्यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता आहे. अशातच आता वंचितने देखील उमेदवार दिला तर ही लढत तिरंगी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोलापुर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी देखील लोकसभेची निवडणुक लढवली आहे. 2019 साली सोलापुर लोकसभा मतदारसंघातून खुद्द प्रकाश आबंडेकरांनी निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे एक लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती.

दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. तर या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिद्धेश्वर महास्वामीजी निवडून आले होते. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याचे अनेकांनी त्यावेळी सांगितले होते. यातच आता पुन्हा वंचित याठिकाणांहून उमेदवार देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचितमुळे नेमका कुणाला फटका बसणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.