राज्यात यापुढे खाजगी वाळू विक्रीचे लिलाव बंद करणार ,वाळू माफीयांना बसणार चाप, महसूल मंत्री - राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा
------------------------------------------------------------------------------------
यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसणार*
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्युज) : राज्यात खासगी वाळू विक्रीचे ठेके बंद करून सरकार स्वत:च वाळूचे उत्खनन करून वाळूचा साठा असणारे डेपो तयार करणार आहेत. सामान्य नागरिक तथा बांधकाम व्यावसायिकांना ऑनलाइन चलन भरून ही वाळू विक्री केली जाणार आहे. अशी महत्त्वाची घोषणा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी ना. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी प्रसिद्धिमाध्यमांसोबत ते बोलत होते. गुजरात, तमिळनाडूत सरकारच वाळूची विक्री करते. तेथे तसा प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील यापुढे सरकारच वाळूची विक्री करणार असल्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याविषयी आवश्यक धोरण ठरविण्यासाठी विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. एका महिन्यात हे धोरण ठरविले जाईल.
राज्यात सुरू असलेले अवैध वाळूचे उत्खनन केले जाते. याविषयी जाब विचारून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहने घालण्याच्या घटना घडत आहे. अनेकदा कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होताना दिसतो. ठरवून दिलेल्य ठेक्यापेक्षा अधिक वाळूचा उपसा केला जातो आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो, शिवाय वाळूच्या काळ्या बाजारामुळे सामान्य नागरिकांनाही महागड्या दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याचे ना. विखे-पाटील यांनी सांगितले. सरकारच वाळूची विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात वाळूमाफीया पुढे आले तरी त्यांच्या दबावापुढे सरकार झुकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.