श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समिती गणेशोत्सव संगीत महोत्सवाचा श्रीकृष्ण गोसावी यांच्या गायनाने शुभारंभ, ◼️ विठ्ठल भक्त आणि रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ):- श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा.सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी सचिन इथापे, व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश अनेचा यांचे उपस्थितीत आज पैठण येथील भजनसम्राट श्रीकृष्ण गोसावी यांच्या सुमधुर स्वरातून गणेशोत्सव संगीत महोत्सवाला शुभारंभ झाला.
सुरुवातीला मंदिर समितीचे सदस्य श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, श्रीकृष्ण गोसावी, व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि कलाकार यांच्या शुभहस्ते विठ्ठल -रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यांनी सुरुवातीला एकनाथ महाराजांचा गजर आणि वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरीने वातावरण भक्तिमय करत स्वतः संगीतबद्ध केलेल्या या पंढरीचे सुख पाहता डोळा, सगुण चरित्रे, विठ्ठल सावळा पंढरीये उभा , असा रे सावळीया अशा सुरेख रचना गात पंढरपूर कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबलावादक दिनेश डोळे, निवेदन कांचन लकडे-ढवळे, टाळ प्रशांत गोसावी, स्वरसाथ चंद्रशेखर गोसावी आणि ओंकार गोसावी यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे यांनी केले. यावेळी विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढेही पाच दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सव संगीत महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले. संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.