शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा
_____________________________________________________
बार्शी;(प्रतिनिधी) :- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक विभाग, अग्नी कुल व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मा. प्रा. सौ. विजयश्री पाटील तसेच महाविद्यालयाचे बी एड विभागाचे माजी विद्यार्थी श्री. मनोज पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे होते. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. डी. भिलेगावकर, बी पी एड विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. जी. कांबळे, श्री. सुरज ढेकणे, कार्यक्रम समन्वयक डॉ.एम व्ही मते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथ पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून सामाजिक जाणीव राखून अंध सहायता निधी संकलन करण्यात आला. यात उपस्थित प्रशिक्षणार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वेच्छेने एकूण रु.२७१४/ संकलन करून राष्ट्रीय अंध संघाचे सोलापूर विभागाचे श्री.सुरज ढेकणे यांच्याकडे रोख स्वरूपात जमा केला. माहिती अधिकार दिन यानिमित्ताने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन व पोस्टर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब बार्शी यांच्या वतीने प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. प्रा. विजयश्री पाटील यांनी वाचन प्रेरणा दिन याविषयी सविस्तर माहिती विशद केली. बालपणापासूनच वाचन संस्कार होणे गरजेचे आहे. वाचन करताना सहज वाचन करणे आणि मनापासून वाचन करणे यात फरक आहे. आपल्याकडे वाचन साहित्य विपुल आहे. विविध संदर्भ ग्रंथ, कादंबऱ्या, वर्तमानपत्रे, नियतकालिके, ईबुक्स यांचे वाचन करणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती संदर्भात जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनप्रणालीत वाचते व्हा. वाचनामुळे विविध क्षेत्रातील माहिती आपणास मिळते.वाचाल तर वाचाल असा संदेश त्यांनी दिला. वाचनाचा प्रारंभ आजपासून करा आणि आपल्या ज्ञानात वाढ करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे बी एड अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी श्री.मनोज पाटील यांनी करिअर मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षक होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, क्षमता या बी एड प्रशिक्षणातूनच पूर्ण होतात. शिक्षकांनी लवचिकता, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, विस्तृत व व्यापक वाचन आदी बाबी जोपासणे गरजेचे आहे. बी एड प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षक व्यवसायाच्या संधीची क्षेत्रे त्यांनी विशद केली. यात राज्य व केंद्रीय स्तरावरील संस्था व कंपन्या यामध्ये बी एड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना व्यापक प्रमाणात नोकरीची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी वाचन प्रेरणा दिन व जागतिक अंध दिन याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासात वाचन कौशल्य महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनातील वेळ हा वाचन करण्यासाठी घालवावा. वाचनाने मनाचा विकास होतो. वाचन केल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. गतिमान युगात गतिमान वाचक असणे गरजेचे आहे. सातत्याने वाचन केल्याने विषयातील सखोलता प्राप्त होते. वाचनाचे विविध स्त्रोत सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. पारंपारिक आणि तंत्रज्ञानावर आधारित स्त्रोतांचा वाचन करण्यासाठी वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरांजली कुलकर्णी यांनी केले. अक्षय डोळसे यांनी वाचन प्रेरणा दिन याविषयी मनोगत व्यक्त केले. रुपाली जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थितांचे आभार दिव्या जाधव यांनी मानले. तांत्रिक साहाय्य श्रीकृष्ण गव्हाणे, शैलेश देशमुख, सुशिल व्हळे, शितल जिरेकर, सायली बाराते तसेच अग्नी कुलाचे सदस्य यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पाटील व शुभांगी माने यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.