कॉलेज ऑफ एज्युकेशनने नॅक मूल्यांकनात गुणवत्तेची परंपरा कायम राखली - डॉ .बी .वाय यादव

कॉलेज ऑफ एज्युकेशनने नॅक मूल्यांकनात गुणवत्तेची परंपरा कायम राखली  -  डॉ .बी .वाय यादव

------------------------------------------------------------------------------------

बार्शी ( पंढरी नगरी न्यूज) श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी या महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात "अ" श्रेणी प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी .वाय यादव होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री .पी .टी पाटील, खजिनदार श्री. जयकुमार शितोळे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, प्राचार्य. डॉ. एस. एस गोरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ .व्ही .पी शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनांक २० व २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नॅक पिअर समितीने मूल्यांकन केले.महाविद्यालयाची इमारत, ग्रंथालय, जलतरण तलाव, इनडोअर हॉल,  विविध क्रीडांगणे, संशोधन केंद्र, एनएसएस विभाग, विद्यार्थी वार्षिक निकाल, शिक्षकांचे व्यवसायिक विकास, तज्ञ प्राध्यापक वृंद, संशोधन लेख, माजी विद्यार्थी संस्था याच्या जोरावरच महाविद्यालयाने ३.०४ गुण मिळवून अ श्रेणी प्राप्त केली.या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संस्था व संस्थेच्या विविध शाखांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस .एस गोरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ व्ही पी शिखरे, सर्व विभागाचे  विभाग प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्री .जयकुमार शितोळे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाची यशस्वी परंपरा विशद केली. तसेच भविष्यातील मूल्यांकनाची तयारी अधिक उत्साहाने सुरू करावी असे त्यांनी आवाहन केले.

प्राध्यापक डॉ. एम .व्ही मते यांनी मनोगत व्यक्त यांनी केले. यावेळी त्यांनी  नॅक तयारी करताना आलेले अनुभव सविस्तरपणे विशद केले. आयक्यूएसी समन्वयक डॉ .व्ही .पी शिखरे यांनी समन्वयक या भूमिकेतून आपले विचार व्यक्त केले. या यशात सर्वांचे योगदान असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस .एस गोरे यांनी नॅकला सामोरे जाताना संस्था व महाविद्यालयाचे योगदान विशद केले. संस्थेचा भक्कम पाठींबा व सहकार्य या जोरावरच "अ" श्रेणी खेचून आणली असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयात भौतिक व मानवी सुविधा उपलब्ध करून देण्यात संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. संस्थेबरोबरच विद्यापीठ, शासकीय व अशासकीय संस्था, सराव पाठ शाळा, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक,माजी विद्यार्थी यांचे योगदान महत्वपूर्ण राहिल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशीच यशस्वी घोडदौड कायम राखली जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे सचिव श्री. पी .टी पाटील यांनी नॅक मूल्यांकनाबाबत समाधान व्यक्त केले व महाविद्यालयाचे कौतुक केले. नॅक ही उच्च शिक्षण संस्था मूल्यांकन प्रणाली आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्तेसाठी नॅक मूल्यांकन गरजेचे आहे. सातत्याने नॅक मूल्यांकन केल्यास महाविद्यालयाच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येते. नॅकची परिपूर्ण तयारी करून सामोरे गेल्यास यश दूर नाही असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष डॉ .बी .वाय यादव यांनी महाविद्यालयाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. संस्थेच्या इतिहासात नोंद घ्यावी अशी ही महत्वपूर्ण घटना आहे. कर्मवीर मामांनी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांवर भर दिला. आज आपण या दोन्ही क्षेत्रात आघाडीवर आहोत. शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात अधिकतम सहभाग राहिला आहे. म्हणूनच नॅक मूल्यांकनात आपण यशस्वी झालो.भविष्यात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण बदल स्वीकारण्यासाठी तयार राहा असे आवाहन त्यांनी केले.

उपस्थितांचे आभार डॉ .आर .ए फुरडे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. ए पाटील यांनी केले.