डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज..! प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी
---------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ग्रंथालय असल्यामुळे या ठिकाणी ग्रंथालय चळवळ उभा राहिली परंतु ग्रंथालय चळवळ आणखीन पुढे नेण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची खरी गरज असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी यशदा अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने यशदा अभ्यासिकेचे उद्घाटन प्रसंगी रस्तोगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार तर ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना प्रधान सचिव रस्तोगी म्हणाले की, "शासनाच्या अनुदानाची अपेक्षा नसताना सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सुरू केलेली यशदा अभ्यासिका निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतल्यामुळे उपक्रम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याकडे रवाना होतात. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाप्रमाणे अभ्यासिका तालुका पातळीवर आणि गावागावात निर्माण झाल्यास निश्चितपणे ग्रंथालय चळवळी याला सुद्धा वेग येईल. नुसती सभासद संख्या आणि पुस्तक संख्या मोठी असेल तर ते ग्रंथालय मोठे मी मानत नाही कारण ग्रंथालय ही एक चळवळ असून त्या ठिकाणी असणारा वाचक वर्ग आणि ग्रंथालयाने वाचकाला वाचन चळवळ उभी राहण्यासाठी दिलेली प्रेरणा यातूनच ग्रंथालय चळवळ जोमाने उभा राहील.
शासनाची मदत शंभर टक्के मिळाली तरी ग्रंथालय चळवळ राहणार नाही तर ती शासकीय ग्रंथालय होतील. आपल्याला ग्रंथालय ही चळवळच म्हणून कार्यरत राहिली पाहिजे त्यासाठी अशा अभ्यासिका गावागावात निर्माण करून नवीन पिढीच्या हातात पुस्तक दिले पाहिजे. प्रत्येक महाविद्यालय मध्ये असणारी ग्रंथालय सध्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड नसल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ग्रंथालय चळवळ लोकांपर्यंत कशी जाईल यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज असल्याचं शेवटी बोलताना रस्तोगी यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार म्हणाले, "सध्या राज्यामध्ये ग्रंथालय चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहत असताना अनुदानाअभावी ग्रंथालय आणि ग्रंथपालकांची असणारी समस्या अतिशय बिकट आहे. त्यामुळे गेल्या साठ वर्षांमध्ये ग्रंथ चळवळीकडे शासनाने निधी देण्यासाठी आखडता हात घेतल्यामुळे अनेक ग्रंथपालांनी आत्महत्या केल्या असून अनेक ग्रंथपाल ब्रेड विकून पोट भरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर ग्रंथालय चळवळ जोमाने उभी करण्यासाठी 288 आमदारांना या चळवळीचे महत्त्व पटवून देणार असून त्यासाठी बैठा सत्याग्रह उभा करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं. प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी वाचनालय जोमाने वाढवण्यासाठी अनुदान वेळेवर मिळण्यासाठी सकारात्मक काम करावं व वर्धा या ठिकाणी येण्याचं आमंत्रण त्यांनी दिलं.
राज्य ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर म्हणाले की, "ग्रंथालय चळवळ ही लोक चळवळ बनली पाहिजे त्यासाठी पुस्तके कपाटात धुळखात न पडता ती लोकांच्या हातापर्यंत कशी गेली पाहिजेत. आणि पुस्तकांने मस्तक कसं सुधारेल. याकडे ग्रंथालय चळवळीने लक्ष देणे काळाची गरज आहे. शहराकडे जाणारा विद्यार्थ्यांचा ओघ थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासिका तालुका पातळीवर आणि गावागावात निर्माण होण्याची खरी गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय चळवळ वाढली पाहिजे वाचन संस्कृती रुजली पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थी अभ्यासकेमध्ये येऊन अधिकाधिक ज्ञान घेऊन अधिकारी बनले पाहिजेत. त्यासाठी वाचन संस्कृती आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. डिजिटल क्रांतीमुळे म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये वाचक संख्या कमी होऊ लागलेली असल्यामुळे ग्रंथालय चळवळीला नवनवीन कौशल्य दाखवून चळवळ पुढे न्यावे लागणार आहे त्यासाठी चांगले काम करण्याची गरज आहे.
ड वर्गातील वाचनालये क वर्गामध्ये नेण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणारच आहोत. परंतु सोलापूर जिल्हा हा लेखक व संतवाणी यांची परंपरा असणारा जिल्हा असल्यामुळे आणि या ग्रंथालय चळवळीमध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे निश्चितपणे सोलापूर जिल्हा गुणवत्तेमध्ये पुढे असल्यामुळे अशाच प्रकारचे उत्कृष्ट कार्य ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून गावागावापर्यंत पोहोचवून आदर्श अभ्यासिका निर्माण करण्याची खरी गरज असल्याचे शेवटी बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे व हरिदास रणदिवे यांनी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान सिंहगड कॉलेजचे प्राचार्य शंकर नवले, काशिनाथ भतगुणकी, शरद सलगर व चवरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथमित्र राम मेकाले, जयंत आराध्ये, गुलाबराव पाटील, श्रीकांत येळेगावकर, जिल्हाध्यक्ष विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाह साहेबराव शिंदे, दत्ता मोरे, अड. संगीता कुमठेकर, प्रकाश शिंदे, संजय सुर्यवंशी, प्रमोद पाटील, प्रदिप गाडे, सोपान पवार, भास्कर कुंभार, विनोद गायकवाड, वृशाली हजारे, सारीक मोरे, सौ.सारीक माडीकर, दिपाली नरखेडकर, गीतांजली गंभीरे, नंदा कुर्ले, राजश्री माशाळकर यांच्यासह ग्रंथालय चालक, सेवक वर्ग व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.