बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा..
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (दैनिक ,पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती तथा मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ एस एस गोरे होते. यावेळी व्यासपीठावर मसाप बार्शी शाखाचे अध्यक्ष पां. न. निपाणीकर, बी आर देशमुख, प्रकाश गव्हाणे, प्रकाश महामुनी, दिलीप कल्याणी, शारदा पानगावकर,सुमन चंद्रशेखर, गिरीश सोनार, डॉ आर ए फुरडे,डॉ पी ए पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शारदा पानगावकर यांनी मराठी गौरव गीत सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बी एड प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. पां. न. निपाणीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यात कोमल नहार, आनंद लोंढे व रणजीत भालेराव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा परीक्षक म्हणून डॉ आर ए फुरडे व डॉ .एम व्ही मते यांनी काम पाहिले.
कोमल नहार यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. बी आर देशमुख व दिलीप कल्याणी यांनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून खुमासदार शैलीत आपले विचार मांडले.
प्रमुख पाहुणे जयकुमार शितोळे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, साहित्यिकांनी चळवळीत सहभाग घेतला पाहिजे. समाजाची भावना साहित्यात आली पाहिजे. प्रदेशानुसार भाषिक भिन्नता आहे. दैनंदिन जीवनात मराठी साहित्य वाचन गरजेचे आहे. रोजच्या व्यवहारात मराठी भाषा वापर वाढला पाहिजे. समाज माध्यमातून मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मराठी भाषेतील साहित्याचे जास्तीत जास्त वाचन झाले पाहिजे.यासाठी आजच्या तरुणांनी मराठी भाषेत लेखन केले पाहिजे. अभिजात भाषेचे लाभ गरजू पर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. लोकव्यवहारात भाषेचा वाढता वापर हा खरा भाषेचा आरसा आहे.शालेय शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. एस गोरे यांनी मराठी भाषा गौरव दिन याविषयी सविस्तर माहिती विशद केली. ते म्हणाले, मराठी राजभाषेतून सर्व दैनंदिन प्रशासकीय व्यवहार झाले पाहिजेत. रोजच्या जीवनात मराठी भाषेचा सन्मान जोपासला पाहिजे. मराठी ही ज्ञान भाषा आहे. मराठी भाषा अधिकतम समृद्ध होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहेत असे त्यांनी सांगितले.
उपस्थितांचे आभार डॉ .पी ए पाटील यांनी मानले. सुचिता गायकवाड व अफरोजजहान मोमीन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शिक्षक, बी एड प्रशिक्षणार्थी व मराठी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.