बार्शीला शिक्षणाची पंढरी संबोधण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे - थोर विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर
------------------------------------------------------------------------------------
बार्शी :( दै.पंढरी नगरी न्यूज )- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी समाजदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक व साकेत प्रकाशनचे प्रकाशक बाबा भांड उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, संस्थेचे अध्यक्ष डॉ .बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी पाटील, सहसचिव ए. पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, डॉ प्रकाश बुरगुटे, राजेंद्र पवार, डॉ. गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार दिलीप सोपल यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, संस्थेची सुरुवात बोर्डिंगच्या माध्यमातून झाली.संस्थेची विधायक वाटचाल आहे. मामांनी जोपासलेल्या परंपरा समाजास प्रेरक आहेत. वैद्यकीय सेवा देण्यात संस्था अग्रेसर आहे. संस्थेच्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी विश्लेषक मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मामांची संस्था ही पुरोगामी विचारांची आहे. संस्थेने स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे. बार्शीत विद्यापीठ सुरू करावे असे वाटते. यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले आहे. तोच वारसा जपला जाण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या जगातील सक्षम राज्य आहे. तरीदेखील विकासाच्या प्रक्रियेत अनेक आव्हाने आहेत. प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक आहेत. ग्रामीण भागात विषमता आहे. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शिक्षण संस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. नव्या आर्थिक रचनेनुसार नवीन तंत्रज्ञान अवगत असलेले मनुष्यबळ आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू करावेत. यात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम असावेत. बेरोजगारी दूर करावी लागेल. राजकीय नेते दूरदृष्टीचे असावेत. खासगीकरणामुळे शिक्षणाचा प्रसार झाला आहे. सर्वत्र काम करणारे तरुण हवे आहेत. शिक्षणातून समाजातील कृत्रिम भेद दूर झाले पाहिजेत. वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय राहिला आहे. यात शेतकरी,महिला, विद्यार्थी, तरुण घटकांचा समावेश आहे. यातून सकारात्मक बदल घडवून आणावेत असे त्यांनी आवाहन केले.
सुप्रसिद्ध साहित्यिक मा. श्री. बाबा भांड यांनी वैचारिक विवेचनातून अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, महात्मा फुलेंचे शिक्षणाचे स्वप्न जगदाळे मामांनी पूर्ण केले.मामांनी कष्टातून व मेहनतीतून संस्था उभी केली. शिक्षण हेच एकमेव समृद्धीचे साधन आहे. म्हणूनच मामांनी बार्शीला शिक्षणाची पंढरी निर्माण केली. मामांचे कार्य महान आहे. वाचन सवयी जोपासा. नवपिढीसाठी वाचन संस्कृती व ग्रंथ विक्रीचे प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे व नितीन कोळी यांच्या वीर माता-पिता, वीर पत्नी व वीर सुपुत्र यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभागाने स्वागत गीत सादर केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ .बी वाय यादव यांनी स्वागतपर संबोधन केले. त्यांनी संस्थेची वाटचाल व माझा वाढदिवस- माझी संस्था उपक्रमाची माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी पाटील यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय संस्थेचे खजिनदार जयकुमार(बापू) शितोळे यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ पी एम लावंड यांनी करून दिली. "कर्मवीर तपस्या" पाक्षिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच डॉ. राहूल पालके लिखित कर्माक्षरे या चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण गाढवे व नीता देव यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे सहसचिव ए. पी देबडवार यांनी मानले.