श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित,जिजाऊ सावित्री - रमाई महिला विकास बळ समितीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यास सायकल भेट

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित,जिजाऊ सावित्री - रमाई महिला विकास बळ समितीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यास सायकल भेट

------------------------------------------------------------------------------------

बार्शी .(दै पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समिती ही महिलांसाठी कार्य करणारी संस्थेची महत्त्वाची उपक्रमशील शाखा आहे. कै. नारायणराव जगदाळे उर्फ बाबा यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून या समितीची स्थापना झालेली आहे. बाबांनी या संस्थेला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी भरीव अशा प्रकारची आर्थिक मदत केली.त्याचप्रमाणे समाजातील दानशूर व्यक्तीकडून मदत मिळवून दिली. या समितीच्या कार्याची व्याप्ती वाढावी यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय डॉ.बी.वाय.यादव 

वेळोवेळी आर्थिक मदत करून मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. संस्थेचे ट्रस्टी कै. प्राचार्य व.न.इंगळे,प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांनीही महिलांच्या उन्नतीसाठी सदर समितीद्वारे अनेक उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण होतकरू गरीब मुलींना आर्थिक मदत तसेच जिवनोपयोगी विविध प्रकारच्या कौशल्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची भूमिका ही समिती पार पडत आहे. संस्थेतील गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना आर्थिक मदत करते त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार विविध शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. आज पर्यंत या समितीने विविध स्तरावर शिक्षण घेणाऱ्या मुलींना आधार दिला आहे. नुकतीच या समितीने संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आवश्यक असणारी सायकल देण्याचे ठरविले त्यानुसार २.८.२०२४ रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणारा गरजू विद्यार्थी आयान पठाण याला सायकल देण्यात आली. कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांच्या हस्ते या सायकलचे वितरण करण्यात आले . त्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी बहुजन समाजासाठी स्थापन केलेल्या संस्थेत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये कोणालाही आर्थिक अडसर येवू नये. यासाठी मामांनी अनेक उपक्रम सुरू केले होते. त्यामुळे सामाजिक उन्नती होण्यास मदत झाली. आजहीआपली संस्था नेहमीच विद्यार्थी केंद्री उपक्रमास प्राधान्य देत आहे. आज आपण दिलेली सायकल या वस्तूचा सदर विद्यार्थ्यास नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही. या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. समितीला आवश्यक ती मदत करण्याचे ही आश्वासन दिले. त्याचप्रमाणे एक सायकल देण्याचे जाहीर केले.

सदर कार्यक्रमास जिजाऊ सावित्रीबाई महिला बळ विकास समितीच्या अध्यक्षा प्रा. सौ. स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविक केले.समितीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, एम.पी.एड. विभाग प्रमुख डॉ. एस. एम. लांडगे, बी.पी.एड. विभाग प्रमुख डॉ ए. जी. कांबळे महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बी. पी .एड विभाग प्रमुख डॉ.ए.जी.कांबळे यांनी दोन सायकल भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. आभार प्रदर्शन डॉ.एल.आय.राठोड यांनी मानले.तर सूत्रसंचालन प्रा. स्मिता सुरवसे यांनी केले.