बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये वृक्ष लागवड व संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन

बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये  वृक्ष लागवड व संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन

---------------------------------------------------------------------------------

बार्शी( दै. पंढरी नगरी न्युज) महाराष्ट्र शासनाने 10 जून ते 24 जून 2024 दरम्यान वृक्ष लागवड व संवर्धन पंधरवडा जाहीर केला आहे. त्यानुसार कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शीच्या महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. निम,वड, पिंपळ, चिंच इ.भारतीय वनस्पतीची लागवड करणे, वनसंपत्तीचे महत्त्व पटवून देणे, वनसंपदावर आधारित चर्चासत्र, निबंध लेखन, तज्ञांची व्याख्याने, प्रश्नमंजुषा, वाद विवाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांनी सांगितले. विकासाच्या नावाखाली जगामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. आपल्या देशात ही जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्याचे दुष्परिणाम आज आपणां समोर येत आहेत. हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. ही खेदाची बाब आहे. प्रदेशाच्या 33% जमीन वृक्षांनी व्याप्त असेल तरच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. मात्र हे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे मानवापुढे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत.

याकडे वेळीच लक्ष दिले तरच मानवी जीवन सुसह्य होईल. पर्जन्याचे प्रमाण कमी कमी होत आहे .दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण वाढत आहे, काही भागात 50° c पेक्षा जास्त तापमानाची नोंद झालेली आहे. तापमान वाढ अशीच होत राहिली तर भविष्यात भयंकर अशा परिणामांना सामोरे जावे लागेल ! याचा विचार करता वृक्ष लागवड व संवर्धन याला पर्याय नाही याबाबत जनजागृती होणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे यांनी मत व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद देऊन, सहभागी व्हावे असे प्राचार्य डॉ. गोरे यांनी आवाहन केले . सदर उपक्रमाचे पाच झाडे लावून प्राचार्यांनी उद्घाटन केले. 

या उपक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी महाविद्यालयाच्या परिसरात, कर्मवीर क्रीडा संकुलामध्ये 260 वृक्षांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले याबद्दल महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राचार्यांनी धन्यवाद दिले. महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमास श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ.बी .वाय.यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील,जॉइंट सेक्रेटरी अरुन देबडवार सर, खजिनदार जयकुमार शितोळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे आभार वृक्ष संवर्धन समन्वयक प्रा. पी.पी. नरळे यांनी मानले.