बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन...
-----------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी व श्रीमान रामभाई शहा रक्तकेंद्र बार्शी यांच्या वतीने सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त कर्मवीर जयंती सप्ताहाचे आयोजन दिनांक २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. यात रक्तदान शिबीर, प्रेरणादायी व्याख्यान, कर्मवीर मामांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविणे, विद्यार्थी मनोगते, समाजप्रबोधन रॅली आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने सप्ताहाची सुरुवात रक्तदान शिबीराने करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस. एस गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. व्ही. पी शिखरे, डॉ .एस .एम लांडगे, डॉ .ए .जी कांबळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ .एस .एस गोरे यांनी रक्तदान शिबिराचा उद्देश विशद केला. ते म्हणाले, कर्मवीर डॉ .मामासाहेब जगदाळे हे एक महान त्यागी समाजसेवक होते. त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या. शेतकरी व गरीबांना न्याय मिळवून दिला. कर्मवीर मामा देखील रक्तदान शिबीर आयोजित करत असत.रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. यातून मिळालेले समाधान सर्वांत मोठे असते. रक्तदान हे एक सामाजिक कर्तव्य आहे. आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी समजून रक्तदान केले पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. प्राचार्य डॉ .एस. एस गोरे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी असे एकूण २६ रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.