महाविद्यालयाच्या लोकप्रियतेत माजी विद्यार्थ्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. जनरल सेक्रेटरी :-पी टी पाटील
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै. पंढरी नगरी न्युज) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी सचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे बी पी एड विभागाच्या १९८५-८६ बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारणी सदस्य व्ही.एस .पाटील, विश्वस्त प्राचार्य डॉ .चंद्रकांत मोरे,प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व कॉलेज जीवनातील अनुभव व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये विलास पवार, अनिल देशपांडे, जयश्री शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या स्नेह मेळाव्यासाठी बी.पी. एड .विभागाचे सेवानिवृत्त प्रो.तिरुपती सर, प्रो. ए. मनोहरण सर ऑनलाइन उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांसी संवाद साधला.
प्राचार्य डॉ.एस. एस. गोरे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. माजी विद्यार्थी कॉलेजचे मौल्यवान धन आहे. माजी विद्यार्थी संस्थेच्या विकासाकडे मोठ्या आदराने पाहतात. या मेळाव्यातून आपण गतकाळातील अनुभव, वर्गातील आंतरक्रिया तसेच मैदानावरील कौशल्य व त्यावेळेसच्या एकूणच सर्व बाबी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणून माजी विद्यार्थी मेळावा आपल्याला एक सुखद अनुभव देऊन जातो. आपले विद्यार्थी देशाच्या विविध काना- कोपऱ्यात आपले कार्य कौशल्य राबवित आहेत याचा आम्हास अभिमान आहे. संपूर्ण देशात आपले विद्यार्थी कॉलेजचा नावलौकिक वाढवित आहेत. या स्नेह मेळाव्यातून आपण सर्वजण एकत्र आलात. आपल्या सुखद-दुःखद भावना व्यक्त केल्या. त्यामुळे निश्चितच एक उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले. माजी विद्यार्थी हे संस्थेचे व कॉलेजचे संदेश वाहक आहेत. निश्चितच आपण या कॉलेजची व संस्थेची भरभराट व नावलौकिक लोकप्रिय कराल अशी आशा आहे. आपण वारंवार असे स्नेह मिळावे आयोजित करावेत, आमच्याकडून आपले नेहमी स्वागत असेलअसे त्यांनी सांगितले.
संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कॉलेज प्रारंभीपासूनच क्रीडा क्षेत्रात लोकप्रिय आहे. देशाच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात आपले विद्यार्थी कार्य करीत आहेत. माजी विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू तयार करत आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, चाळीस वर्षानंतर महाविद्यालयाचा परिसर पाहून तसेच येथील मानवी व भौतिक सुविधा बद्दल समाधान व्यक्त केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ज्या मैदानावर आपण क्रीडा कौशल्य विकसित केले तसेच अध्यापनाचे कौशल्य आत्मसात केले त्याच महाविद्यालयात आज आपण एकत्र आलेलो आहोत हे पाहून खूप आनंद वाटला. संस्थेच्या व कॉलेजच्या परिसरात आपले नेहमीच स्वागत आहे. आपल्याकडून आपल्या तज्ज्ञतेचा फायदा संस्थेला व कॉलेजला होणार आहे. अनेक माजी विद्यार्थी संस्थेच्या विकासात भर घालत आहेत. यामध्ये आपणही सहभागी होऊन संस्थेला भरीव असे योगदान द्यावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कर्मवीर डॉ .मामासाहेब जगदाळे यांनी शिक्षणशास्त्राबरोबरच शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू केले. यातून उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावेत तसेच तज्ञ क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत म्हणून बी.पी.एड.कॉलेज सुरू केले. कॉलेजच्या क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापकांनी या संधीचे सोने केले आणि एक नावलौकिकास प्राप्त असे कॉलेज संपूर्ण देशात लोकप्रिय केले. कॉलेजच्या लोकप्रियतेत माजी विद्यार्थ्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या व इतर निमित्ताने आपण सतत कॉलेजला येत जा. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आम्हाला सुचवा. निश्चितच आम्ही त्या प्रत्यक्षात राबविण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शकुर सय्यद यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व उपस्थितांचे आभार प्रा.पी.पी. नरळे यांनी मानले. प्रा. स्मिता सुरवसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या मेळाव्यास माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यातून माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या व कॉलेजच्या विकासासाठी आर्थिक स्वरूपात देणगी देण्याची इच्छा व्यक्त करून सढळ हाताने रोख रक्कम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली. सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, डॉ. एस.एम.लांडगे, प्रा. पी.पी. नरळे, डॉ.स्मिता सुरवसे, डॉ.एस.एल.जाधव यांनी परिश्रम घेतले.