अहो गोपीचंद पडळकर, सांगा आता मुके, बहिरे कोण हो - कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) : कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.गतवर्षी आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे सरकार मुके आणि बहिरे असल्याची टिका केली होती. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. शेतकरी संकटात आहे, मात्र अगदी पडळकर देखील फिरकले नसल्याने, मुके आणि बहिरे कोण? शेतकरी प्रश्न विचारीत आहेत.
रुई (ता. निफाड) गावात जून २२ मध्ये कांदा परिषद झाली होती. त्यावेळेस सरकार मुके व बहिरे आहेत, अशी टिका आमदार पडळकर यांनी केली होती. सध्या शेतकरी शेतातच कांदा पीक नष्ट करीत आहेत. आंदोलन होत आहे, त्यावर आमदार पडळकर गप्प कसे असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
कांदा परिषदेमध्ये पडळकर यांनी महाविकास आघाडीचे सरकार बहिरे, आंधळे अन मुके असल्याचे संबोधले होते. प्रवीण दरेकर यांनी या कांदा परिषदेत बोलताना ४० वर्ष उलटूनही कांद्याचे प्रश्न कायम आहेत, याची खंत आहे.
सरकार बदलले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तेव्हा रडणारे, गळा काढणारे आत्ताचे सत्ताधारी आता मूग गिळून गप्प का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. व्यासपीठावरून मोठमोठी लांबलचक भाषणे करताना आपल्याला शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, बळीराजा अशा अनेक प्रकारच्या उपमा देवून त्यांची भलावण करतात; परंतू प्रत्यक्षात मदत करण्याची वेळ आल्यावर हजार कारणे सांगितली जातात, असे सांगितले होते.
गेल्या दोन आठवड्यापासून हा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी बाजार समितीचे लिलाव बंद पाडत आहेत. रोज आंदोलन होत आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. केंद्र सरकारच्या धोरणाने कांदा दर कोसळ्याची तक्रार आहे. याबाबत सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी देखील शासनाचे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने कांद्याला अनुदान न दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा तेव्हा दिला आहे. आता त्या घोषणा विसरले की काय? प्रश्न केला आहे.