बार्शीच्या कर्मवीर जलतरण तलावामुळे नवोदितांना संधी..
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै. पंढरी नगरी न्युज ) : शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी, कर्मवीर जलतरण तलाव, जिल्हा जलतरण असोसिएशन, सोलापूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी तानाजीराव मोरे यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे हे होते. या स्पर्धा १४,१७ व १९ वयोगटातील मुलामुलींसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. यात ३९ माध्यमिक शाळातील ४६९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
ग्रामीण भागातील खेळाडूंना जलतरणाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण कर्मवीर जलतरण तलावाच्या माध्यमातून दिले जात आहे. बार्शी तालुक्यातील नवोदित खेळाडूंना ही एक मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. शिस्तबद्ध पध्दतीने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मोरे यांनी केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ .एस एस गोरे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांनी देखील क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. कर्मवीर शिक्षण संकुलाच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्ये विकसित करण्यासाठी व्यासपीठ दिले जात आहे. ग्रामीण भागातील गरजू व नवोदित खेळाडूंनी कर्मवीर जलतरण तलावाच्या माध्यमातून बार्शीचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अमोल जावळे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक बी पी एड विभाग प्रमुख डॉ. ए जी कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ .एल आय राठोड यांनी केले. स्पर्धेचे नियोजन व्यवस्थापक श्री सुंदरराव लोमटे यांनी केले.