शहाजीबापू पाटलांचा विधानसभेच्या मैदानातून पळ? विधान परिषदेवर पाठविण्यासाठी भाजप नेत्याला साकडे..

शहाजीबापू पाटलांचा विधानसभेच्या मैदानातून पळ? विधान परिषदेवर पाठविण्यासाठी भाजप नेत्याला साकडे..

_____________________________________________________

पंढरपूर; प्रतिनिधी : 'काय झाडी, काय डोंगार'फेम बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील  यांनी आपल्याला चक्क विधान परिषदेवर पाठविण्याचे साकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना घातले आहे.

आमदार पाटील यांच्या मागणीनंतर शिंदे गटात व सांगोला मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.

शेकापचे पुढील काळातील मोठे आव्हान पाहूनच शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेच्या मैदानातून पळ काढल्याची चर्चा त्यांच्या विधानानंतर सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. हे सांगताना त्यांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना सांगोल्यातून आमदार करण्याची गळ घातली आहे.

सांगोल्याचे दिवगंत शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभव स्वीकारणारे शहाजी पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांच्या फरकाने सांगोल्यातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत शेकापचे आव्हान मोठे राहणार याची जाणीव झाल्यानेच आमदार शहाजी पाटील यांनी आता विधानसभेऐवजी विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्या सारखं विधान परिषदेवर पाठवा अशी जाहीर मागणी आमदार पाटील यांनी भाजप नेते दरेकर यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी ही मागणी केली आहे. काय झाडी, काय डोंगर या डायलाॅगमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून आताच पळ काढलाय की काय? अशी टीका विरोधकांकडून केली‌ जाऊ लागली आहे.