संगेवाडी येथे सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

संगेवाडी  येथे सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

-----------------------------------------------------------------------------------

संगेवाडी (पंढरी नगरी न्यूज )मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज आंदोलन करत आहे. या आंदोलनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता महिलाही पुढे येत असून सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला आहे.

शासनाला 40 दिवसांची मुदत देऊन ही मराठा समाजाला आरक्षण न दिल्याच्या निषेधार्थ मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली (सराटी) येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. त्यानुसार सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. मेणबत्ती मोर्चा, साखळी उपोषण, सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदी, निवडणुकांवर बहिष्कार अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे.
भगव्या झेंड्याने सजवलेल्या बैलगाडीमध्ये शिवरायांची प्रतिमा ठेवून गावातून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. यात शालेय विद्यार्थी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे आजी-माजी चेअरमन, संचालक दूध डेअरींचे चेअरमन, भजनी मंडळे आणि युवकवर्गांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. 
यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, कोण म्हणतं देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 

सोमवार पासून गावात साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून गावातील सकल मराठा बांधवांनी उत्स्फूर्तपणे या साखळी उपोषणात सहभाग आहे.