सोहाळे येथे मारहाणीत रोकड लुटली; सहाजणांवर गुन्हा दाखल

सोहाळे येथे मारहाणीत रोकड लुटली; सहाजणांवर गुन्हा दाखल

---------------------------------------------------------------------------------
                    दरोड्याचा गुन्हा; दोघांना अटक
---------------------------------------------------------------------------------

मोहोळ (पंढरी नगरी न्यूज)– मोहोळ तालुक्यातील सोहळे येथे नाटक बघून रात्री घराकडे परतत असताना मोटार अडवून मारहाण करीत रोकड लुटल्याची घटना सोहळे (ता. मोहोळ) येथे शुक्रवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात कामतीच्या पोलिसांनी स्कॉर्पिओ मोटारीतून आलेल्या ६ जणाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. त्यांना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने रविवारी दिला आहे.

सागर उर्फ महांतेश श्रीशैल हुंडेकरी (वय २४ रा. भवानी पेठ, सोलापूर), राहुल उर्फ श्रीकांत सुरेश गेजगे (वय २८ रा.दमानी नगर, सोलापूर), श्रीनिवास गायकवाड, सुरज राठोड, अवि राठोड आणि विशाल राठोड (सर्व रा. दोड्डी ता.दक्षिण सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सागर हुंडेकरी आणि राहुल गेजगे या दोघांना पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी घेतली आहे.

सोहळे (ता.मोहोळ) येथील प्रशांत विठ्ठल जगताप (वय ३८) हे शेतकरी शुक्रवारी रात्री सोहळे पासून एक किलोमीटर अंतरावर नाटक बघण्यासाठी गेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आपल्या मुलांसह बोलेरो जीप मधून घराकडे निघाले होते. त्यावेळी स्कार्पिओ मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्यांची बोलेरो अडवून बेदम मारहाण केली. त्यांच्या खिशातील ४ हजार ७०० रुपये रोख आणि इतर कागदपत्रे असलेली पाकीट लुटून घेतली. त्यावेळी गावातील नागरिकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी ६ जणाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.पुढील तपास सहाय्यक निरीक्षक माने करीत आहेत.