तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात नवोदय स्थापना दिन साजरा..
---------------------------------------------------------------------------------
तुळजापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : तुळजापूर तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे १३ एप्रिल हा दिवस नवोदय स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी नवोदय जनक स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह व विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.
जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना १३ एप्रिल १९८६ रोजी झाली हे औचित्य साधून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी राजीव गांधींच्या स्वप्नातील नवोदय विद्यालय यासंदर्भात मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता साधता आली पाहिजे, मुला मुलींना एकत्र शिक्षण घेता आले पाहिजे, संगणकीय प्रणालीचा उपयोग करता आला पाहिजे असे वेगवेगळे उद्देश ठेवून या जवाहर नवोदयची स्थापना राजीव गांधींनी कशा पद्धतीने केली हे सांगून आज भारतात ६७० नवोदय विद्यालये शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टपणे भरारी कशी घेत आहेत हे सांगून नवोदय मधील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात कसा बहुमुखी बनत चाललेला आहे. यावर आपले विचार व्यक्त करून राजीव गांधींचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरी जाधव यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.