यापुढे दिपक(आबां) सांळुखे - पाटलावर अन्याय झाल्यास सहन करणार नाही!
------------------------------------------------------------------------------------
दीपक( आबा) साळुंखे कार्यकर्त्यांची भावना*
------------------------------------------------------------------------------------
सांगोला (दै.पंढरी नगरी न्यूज) : आघाडीचा धर्म पाळतांना कार्यकर्त्यांचा प्रचंड संच असूनही सांगोला विधानसभा मतदारसंघात सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सारख्या गुणी नेत्यावर पक्षाकडून अन्याय झाला.तरी, दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कधीच कसलीही तक्रार न करता प्रामाणिकपणे पक्षवाढीचे काम केले.
मात्र यापुढील काळात दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर अन्याय झाल्यास तो आम्ही सहन करणार नाही असा निर्धार सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविवार दि. ११ रोजी मंथन शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास स्व. आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड लतिफ तांबोळी उद्योग व्यवसाय सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित मंथन शिबिर वेध भविष्याचा या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिबिरात आगामी काळात देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नजरेतील महाराष्ट्र साकारणार असल्याचा एकमुखी निर्धार या शिबिरातून करण्यात आला. खा. शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. शिर्डी जि. अहमदनगर येथील पक्षाच्या शिबिरानंतर प्रत्येक मतदार संघात पक्षाचे मंथन वेध भविष्याचा हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी सांगोला येथे आयोजित शिबिरात मार्गदर्शन करतांना पक्षाचे जेष्ठ नेते बळीराम साठे म्हणाले, सांगोला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. दिपकआबा आणि जयमालाताई गायकवाड या बहीणभावांनी सत्ता असो किंवा नसो तालुक्यात असणारी ताकद कायम ठेवली आहे.
पक्षाने जिल्ह्यात आजवर आयोजित केलेल्या सर्व शिबिरात सांगोला येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आता जेंव्हा आपण पवार साहेबांची भेट घेऊ तेंव्हा सर्वात प्रथम अनेक वर्षांपासून उपेक्षित असणाऱ्या दिपकआबांना न्याय देण्याची विनंती करणार आहोत. आबांची सांगोला तालुक्यातील राजकीय ताकद त्यांचा अनुभव आणि काम करण्याची तळमळ पाहता अशा सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्याची विनंती प्राधान्याने नेतृत्वाकडे आपण करू असेही शेवटी बळीराम काका साठे म्हणाले.
पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बूथ यंत्रणा सक्षमकरणावर भर द्यावा असे आवाहन उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना केले. तसेच सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा घणाघात केला. सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने आणि विश्वासाने करणाऱ्या दिपकआबांना यापुढील काळात न्याय मिळवून देण्यासाठी आपण तत्पर राहू असेही यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले.