श्री श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरा गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्त करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई, ◼️ मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार गम याची माहिती
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर मार्फत वयोवृद्ध, दिव्यांग तसेच गरोदर महिला भाविकांसाठी मंदिर परिसरात मोफत ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सेवेसाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड, पुणे यांच्या मार्फत कंत्राटी पद्धतीने वाहन चालक नियुक्त करण्यात आलेले आहेत.
यामधील श्री कुणाल राजेंद्र घोडके, पंढरपूर या कंत्राटी कर्मचाऱ्याने भाविकांकडून पैसे स्वीकारल्याचा प्रकार सीसीटीव्ही चित्रिकरणामध्ये आज दि. 15 मे, 2026 रोजी रात्री 8.25 वा. दरम्यान श्री संत नामदेव पायरी येथील मुखदर्शन रांगेच्या गेट क्रमांक 1 येथे निदर्शनास आला आहे. मंदिर समितीमार्फत सदर ई-रिक्षा सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत असताना संबंधित कर्मचाऱ्याने भाविकांकडून पैसे स्वीकारून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून संबंधित कर्मचाऱ्याची सेवा तात्काळ कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याची तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच बीव्हीजी इंडिया लिमिटेड, पुणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली ई-रिक्षा सेवा पूर्णपणे मोफत आहे. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. कोणत्याही व्यक्तीकडून शुल्काची मागणी करण्यात आल्यास भाविकांनी तात्काळ मंदिर समितीकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. मंदिर समिती अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे.