ऐन दिवाळीत प्राथमिक शिक्षकांचे पगार खोळंबले.
******************************************************
पंढरी-नगरी न्यूज : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचा आदेश राज्य शासनाने काढला असतानाही शिक्षकांचे वेतन अद्याप खात्यावर जमा न झाल्याने यंदा मात्र शिक्षकांना दिवाळी उसनवारीवरच करावी लागणार अशीच काहीशी चर्चा सध्या शिक्षकांमध्येही होत असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने दिवाळी सणासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचान्यांना वेतन अदा करण्याचे आदेश त्यानुसार तातडीने बिलेही जमा करण्यात आली. जिल्हा परिषद माध्यमिक, खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे वेतन शुक्रवारीच खात्यावर जमा करण्यात आली असताना मात्र काही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन शनिवार सायंकाळपर्यंत खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे आता दिवाळीचा सण सुरू झाला असून, वेतन न झाल्याने प्राथमिक शिक्षकांना उसनवारीवरच सण साजरा करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, रविवार, सोमवार असे दोन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे मंगळवारीच वेतन होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे. दरम्यान, सर्वच जि. प.च्या मुख्याध्यापकांना वेळेत बिले तालुकास्तरावर जमा केली. त्यानुसार जिल्हास्तरावरही पोहोच करण्यात आलेली आहेत. मात्र, शासनाकडून १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी कमी आलेला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन करता येत नसल्याचे समोर आले आहे. शुक्रवारपासून दिवाळी सुरू झाली आहे. त्यामुळे वेतन लवकर हाती पडेल आणि दिवाळी चांगल्यापद्धतीने साजरा करण्याचे नियोजन शिक्षकांनी केले होते; मात्र वेतनच न झाल्याने सध्यातरी उसनवारीवरच सण करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.