बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन :- प्राचार्य एस एस गोरे
---------------------------------------------------------------------------------
बार्शी;( पंढरी नगरी न्यूज ) श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन मंगळवार दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले. या वेबिनारचा मुख्य विषय "हवामान बदलाचा पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम आणि उपाययोजना" असा होता. वेबिनारच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव होते. साधन व्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील डॉ. संभाजीराव शिंदे व मुंबई विद्यापीठातील डॉ. सुनीता मग्रे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. सी एस मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे, आयक्यूएसी समन्वयक तथा आंतर विद्याशाखा अभ्यासचे अधिष्ठाता डॉ. व्ही पी शिखरे, वेबिनार समन्वयक डॉ. पी ए पाटील, सहसमन्वयक डॉ. एस एल जाधव आदी उपस्थित होते.
वेबिनारच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वेबिनारचा उद्देश विशद केला. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून हवामान बदलावर आधारित राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव यांनी हवामान बदल आणि पाण्याचे स्त्रोत यावर माहिती सांगितली. हवामान बदल हा आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हवामान बदलाचा मानवावर आणि निसर्गावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे जलद गतीने दैनंदिन हवामानात बदल होत आहेत. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे. पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हवामान बदलामुळे पाण्याचे स्त्रोत व पिण्याचे पाणी यावर गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी असे त्यांनी आवाहन केले.
साधन व्यक्ती डॉ. सुनीता मग्रे यांनी "आपत्ती व्यवस्थापन" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापन संकल्पना, प्रकार, मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि भविष्यातील करावयाच्या उपायोजना याविषयी सविस्तर माहिती विशद केली. दुसऱ्या सत्रात साधन व्यक्ती डॉ. संभाजीराव शिंदे यांनी "हवामान बदल आणि पाण्याचे स्त्रोत" यावर माहिती सादर केली. यात त्यांनी हवामान बदल संकल्पना, हवामान बदलाचे पुरावे, दैनंदिन निरीक्षणे, हवामान बदलाचे घटक इ घटक सांगितले. हवामान बदलाचा दैनंदिन मानवी जीवनशैलीवर परिणाम होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढत आहेत. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. भविष्यातील पाणी वाचवायचे असेल तर योग्य ती उपाययोजना वेळीच करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वेबिनारचे प्रास्ताविक डॉ पी ए पाटील यांनी केले. डॉ. एम व्ही मते , डॉ एम एस डिसले, प्रा. स्मिता सुरवसे , डॉ ए जी कांबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य व साधन व्यक्ती यांचा परिचय करून दिला. उपस्थितांचे आभार डॉ व्ही पी शिखरे व डॉ एस एल जाधव यांनी मानले. प्रा. पी पी नरळे यांनी सूत्रसंचालन केले.