माहिती अधिकार कायदा हा लोकांना न्याय मिळवून देण्याचे शस्त्र- राज्य प्रशिक्षक प्रा. शिवाजीराव पवार

माहिती अधिकार कायदा हा लोकांना न्याय मिळवून देण्याचे शस्त्र- राज्य प्रशिक्षक प्रा. शिवाजीराव पवार

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर, दि. 4 (पंढरी-नगरी न्यूज) :- माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य लोकांना पारदर्शकपणे माहिती मिळण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. हा कायदा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीचे एक शस्त्र असून या शस्त्राचा प्रचार व प्रसार ग्रंथालयाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत व्हावा, असे आवाहन माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक व राज्य प्रशिक्षक प्रा. शिवाजीराव पवार यांनी केले.
        
येथील हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालयाच्या जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये प्रा. पवार मार्गदर्शन करत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील,  संपतराव झळके, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे कार्यवाह डॉ. येळेगावकर  उपस्थित होते.
   
यावेळी श्री. पवार म्हणाले की माहिती अधिकार कायदा हा लोकांना गतिमान पद्धतीने माहिती मिळण्यासाठी आणि शासन कारभारात उत्तरदायित्व मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रंथालय चळवळीलाही हा कायदा पोषक आहे. त्यामुळे  ग्रंथालयाने त्यांच्या माध्यमातून गावातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती अधिकार कायद्याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करावी. प्रत्येक नागरिकाला याविषयी माहिती देऊन या कायद्याचा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शस्त्र म्हणून प्रत्येक नागरिक कशा पद्धतीने वापर करेल याबाबत प्रशिक्षित करावे असे आवाहन त्यांनी केले.
    
माहिती अधिकार कायद्याला जवळपास सतरा वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कायदा पोहोचण्यासाठी ग्रंथालय चळवळ मदत करेल आणि प्रामाणिक हेतू आणि योग्य माहिती मागणाऱ्या नागरिकांना त्वरित माहिती उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी दिली.
    
यावेळी जिल्हाभरातून अनेक ग्रंथालयाचे जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील व आभार प्रकल्प समन्वयक देशमुख यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक प्रदीप गाडे तसेच हिराचंद वाचनालयाचे ग्रंथपाल दत्तात्रेय मोरे, जगदीश ईमड़शेट्टी यांनी परिश्रम घेतले.