श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरे समितीस भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांचेकडून भोग प्रमाणपत्र, प्रमाणपत्र मिळवणारी मंदिर समिती ही जिल्ह्यातील एकमेव संस्था ठरली :-- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर मार्फत श्रींच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मोफत भोजनप्रसाद तसेच अल्प देणगी मुल्य आकारून लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. सदरचा लाडूप्रसाद व भोजनप्रसाद अन्न व औषध प्रशासनाकडील सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत असल्याने भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडून मंदिर समितीस “भोग प्रमाणपत्र” मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
मंदिर समितीमार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून एमटीडीसी भक्तनिवास येथे लाडूप्रसाद व श्री संत तुकाराम भवन येथे भोजन प्रसाद तयार करण्यात येतो. या दोन्ही ठिकाणची संबंधित कार्यालया मार्फत अनेकवेळा पाहणी व तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जागा स्वच्छता, कर्मचा-याचे आरोग्य विषयक प्रमाणपत्र, सुरक्षा साधनांचा वापर, अप्ररॉन, हॅण्डग्लोज व इतर अनुषंगीक बाबींचा वापर, शासनमान्य कच्च्या मालाचा वापर व इतर अनुषंगीक बाबींची तपासणी करण्यात आली तसेच काही सुचना व सुधारणा मंदिर समितीस सुचवित आल्या होत्या. त्यामध्ये आवश्यक ती दुरूस्ती व सुधारणा करण्यात आल्यानंतर संबंधित कार्यालय मार्फत अंतिम पाहणी करून मंदिर समितीस हे प्रमाणपत्र दि.27 जून, रोजी बहाल करण्यात आले आहे.
असे प्रमाणपत्र मिळवणारी मंदिर समिती ही जिल्ह्यातील एकमेव धर्मादाय संस्था ठरली आहे. मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये अन्नदान व लाडूप्रसादाची व्यवस्था भाविकांना पुरविण्यात येते. सदरचा भोजन प्रसाद व लाडू प्रसाद अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून तयार करण्यात आहे. सदर प्रमाणपत्र मिळाल्याने सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य महोदय कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच संबंधित कार्यालयाचे अधिकारी यांनी चांगले मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.