पोलिस अधिकारी व अंमलदाराने कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे - सुनील फुलारी
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर,( दै.पंढरी नगरी न्यूज ) प्रत्येक पोलिस अधिकारी व अंमलदाराने कर्तव्य प्रामाणिक व चोखपणे बजावून पोलिस खात्यास शोभनीय काम करावे. त्यांच्या कामाचे बक्षीस, पदकांचे प्रस्ताव सादर करावेत.येथील अधिकाऱ्यांनी अधिकाधिक बक्षिसे व पदके प्राप्त करावीत. जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी हे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर परेडची पाहणी करून सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांची वार्षिक तपासणी केली.यावेळी झालेल्या दरबारात उत्कृष्ट कामगिरी करणारे पदक व पुरस्कारप्राप्त अधिकारी व अंमलदारांचा त्यांनी सत्कार केला. सत्कार झालेल्यांमध्ये करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, भरोसा सेलमधील महिला पोलिस कर्मचारी सुरेखा शिंदे, अर्चना शिंदे, श्वान पथकातील टेरी व जिमी श्वानाचे प्रशिक्षक व हॅन्डलर पोलिस अंमलदार सिद्धलिंग स्वामी, चिदानंद रायकोटी, राजू इंगळे यांचा समावेश आहे.