पंढरपूर माघी यात्रा कालावधीत शहरात मांस, मटण विक्रीस मनाई :- प्रांत अधिकारी सचिन इथापे
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर,( दै पंढरी नगरी न्यूज):- माघ शुध्द एकादशी 08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, माघ यात्रा कालावधी दि. 02 ते 12 फेब्रुवारी आहे. या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या वारी कालावधीमध्ये दि.07 ते 09 फेबुवारी 2025 या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन उपविभागीय दंडाधिकारी श्री.इथापे यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत.
मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्रीस मनाई
श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांकडून नामदेव पायरी व मंदीर परिसरात नारळ फोडण्याने नारळाचे पाणी रस्त्यावर येवून चिखल व घसरंती होण्याची शक्यता आहे. तसेच विक्रेते नारळाची साल काढून मंदिर व मंदिर परिसराच्या बाजूस टाकल्याने केसरास आग लागण्याची शक्यता असल्याने. श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दि. 06 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.