खेडभोसे सोसायटीच्या तब्बल 500 सभासदांचे सभासदत्व रद्द होणार ? नियमबाह्य सभासदत्व, कर्ज वाटप केल्याची तक्रार

खेडभोसे सोसायटीच्या तब्बल 500 सभासदांचे सभासदत्व रद्द होणार ?  नियमबाह्य सभासदत्व, कर्ज वाटप केल्याची तक्रार

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) सोसायटीचे सभासदत्व घेण्यासाठी किमान दहा गुंठे तरी जमीन नावावर असणे गरजेचे असताना दहा गुंठे ही जमीन नावावर नसलेले सभासद करून घेतले आहेत तसेच खावटी कर्ज वाटप करताना मनमानी केल्याच्या तक्रारीवरून खेडभोसे सोसायटीच्या तब्बल 500 सभासदांचे सभासद रद्द करण्याचे संकेत मिळाले असून सहाय्यक निबंधक पी. सी. दूरगुडे यांनी खेडभोसे सोसायटीला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित खेडभोसे, या संस्थेतील सभासद अ. क्र. 1 ते 504 यांच्या नावे 10 गुंठे जमीन असल्याची महसुली नोंद नाही तसेच खावटी कर्ज वाटप करताना अपंग, विधवा, निराधार, शॉफ्ट लाईसन्स घेणे गरजेचे असताना संस्थेने नियमाचे उल्लंघन केले आहे. संस्थेने अ.क्र. 1 ते 504 सभासदांकडून नवीन नियमाप्रमाणे सभासद फी 200 रुपये भरून घेणे गरजेचे आहे. मात्र या यादीतील 504 सभासदांनी सभासद फी 200 रुपये भरणा केलेली नाही. लेखापरिक्षण अहवालामधून सदर सभासदांची नावे कमी करण्यात यावे. तसेच संस्थेने कार्यक्षेत्राबाहेरील सभासद करुन घेतलेले आहेत ,सदर सभासदांची नावे कमी करणेबाबतची तक्रार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पी. सी. दुरगुडे यांचेकडे करण्यात आली होती. 

या तक्रारीवर सहाय्यक निबंधक यांनी खेडभोसे सोसायटीला 11 जुलै पर्यंत आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

◼️ : खेडभोसे सोसायटीच्या तत्कालीन सचिवाने मनमानी पणे कामकाज करून नियमबाह्य सभासद करून घेतले, तसेच खावटी कर्ज वाटप करतानाही नियमबाह्य कर्ज वाटप केले होते, याबाबत सहाय्यक निबंधक यांनी यापूर्वीही खेडभोसे सोसायटीचे तब्बल 409 सभासदांचे सभासदत्व रद्द केले होते. आता पुन्हा सुमारे 500 सभासदांचे सभासदत्व रद्द होण्याची नामुष्की सोसायटीवर ओढवली आहे.