जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न , कनिष्ठ गटात चंदना भोसले व वरिष्ठ गटात साहिल कांबळे पहिल्या क्रमांकाचे मानकरी
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर ( पंढरी नगरी न्यूज ) जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कनिष्ठ गटात पोखरापूर ता.मोहोळ येथील चंदना भोसले व वरिष्ठ गटात अक्कलकोटचा साहिल कांबळे हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटात पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांसाठी आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेचे उदघाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड,परिक्षक प्रा.राजशेखर शिंदे , प्रा.संघप्रकाश दुड्डे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , संवाद सल्लागार सचिन सोनवणे , मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर , क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे , प्रशांत दबडे , दिपाली व्हटे , अर्चना कणकी , यशवंती धत्तुरे, अल्फिया बिराजदार यांच्यासह बी.आर.सी.व सी.आर.सी.यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी दोन्ही गटातील स्पर्धकांनी पाणी वाचवा , पाणी गुणवत्ता , जलसंवर्धन तसेच शाश्वत पाणी पुरवठा योजना याविषयी विचार व्यक्त केले.या स्पर्धेमधील कनिष्ठ महाविद्यालयीन गटात जगदंबा विद्यालय पोखरापूर ता.मोहोळची चंदना भोसले ,महात्मा गांधी विद्यालय करमाळ्याची श्रेया अनिल गलांडे व विद्यामंदिर हायस्कूल व काॕलेज सलगर बु.ता.मंगळवेढ्याची धानेश्वरी स्वामी तसेच वरिष्ठ गटात सी.बी.खेडगीज महाविद्यालय अक्कलकोटचा साहिल कांबळे , प्र.मो.पा.महाविद्यालय , करमाळ्याची दिव्या सुपेकर व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळ्याचा आबुब शेख हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकासाठी विजेते ठरले.
यावेळी जिल्ह्यात वक्तृत्व स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांबरोबर सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना शाश्वता , पाणी वाचवा , पाण्याची बचत , पाणी गुणवत्ता याविषयी ग्रामस्थांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव यांनी केले. सदर स्पर्धेचे परिक्षण दयानंद महाविद्यालयाचे प्रा.राजशेखर शिंदे , संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा.संघप्रकाश दुड्डे व पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे यांनी केले तसेच सुत्रसंचालन महादेव शिंदे यांनी केले तर आभार सचिन सोनवणे यांनी मानले.जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक , स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन लवकरच कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.