वाळू माफियांना ‘घाम’ फुटला, सरकारी बाबूंनाही बसणार ‘टोला’; फडणवीसांनी ठणकावले
------------------------------------------------------------------------------------
» काळाबाजार नाही सहन करणार
» कुचराई करणाऱ्यांना दयामाया नाही
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वाळू माफियांना तसेच सरकारी बाबूंना गर्भित इशारा दिला आहे. मी गृहमंत्री असेपर्यंत वाळूचा काळाबाजार होऊ देणार नाही असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारने ठरवलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्यात कुणी कुचराई केल्यास ती सहन केली जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारी बाबूंनाही ठणकावले.
वाळू चोरी हा विषय महसूल मंत्रालयाच्या अखत्यारित आहे परंतु फडणवीस यांनी दिलेली ही सूचना पाहाता वाळू धोरण ठरवण्याच्या पडद्यामागील खरे ‘किंग’ देवेंद्रजीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांच्या या गर्जनेमुळे वाळू माफियांना घाम फुटणार असून कर्तव्यात हलगर्जिपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा ‘टोला’ बसणार आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाळूचा काळाबाजार होत आहे. त्याचप्रमाणे, वाळू तस्करीसंदर्भातील अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. वाळू धोरणाचे सर्वसामान्यांमधून स्वागत झाले. तरीही छुप्या मार्गाने वाळूची तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनीही वाळूमाफियांना ठणकावले आहे. रविवारी नागपुरात क्रेडाई या रिअल स्टेट डेव्हलपर्स (बिल्डर्स) संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
वाळूचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नव्या धोरणानुसार वाळूचे उत्खनन करणारा आणि वाळू विकणारा एकच व्यक्ती नसेल. नव्या धोरणांतर्गत राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले गेले आहेत. नव्या धोरणानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात निश्चित ठिकाणी वाळूचे डेपो तयार करायचे आहे. तिथून वाळूची वाहतूक करणारा वाळू घेऊन जाऊन ग्राहकाला निश्चित ठिकाणी त्याचा पुरवठा करेल. त्यासाठी दर निश्चित केले जातील.
त्या माध्यमातून वाळूचा काळाबाजार पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न असून बांधकामासाठी कमी दरात वाळू उपलब्ध होईल, असा विश्वास फडणवीस यांनी बांधकाम व्यवसायिकांना दिला. ग्राहकांना मुबलक प्रमाणामध्ये वाळू मिळवून देण्याचे काम आम्ही करू. वाळूच्या व्यवसायात आतापर्यंत एक रॅकेट कार्यरत होते. त्या रॅकेटमधील लोक वाळू घाटाचे लिलाव होऊ देत नव्हते. तेच लोक वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण करायचे आणि मग वाळू चढ्या दराने विकायचे.
गृह विभागाचा कारभार सांभाळत असल्यापासून वाळूचा काळाबाजार थांबवण्यासाठी मी कठोर पावले उचलली आहेत. वाळूचा काळाबाजार करणाऱ्यांवर यापूर्वीही कारवाई केली आहे आणि अनेक वाळू माफियांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले आहे, असे फडणवीस म्हणाले.
● बिल्डर्सना दिलासा…
वाळू धोरणाबद्दल मंत्रिमंडळात निर्णय झाले असून लवकरच नवे वाळू धोरण राज्यात लागू करू असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, बिल्डर्सला कन्स्ट्रक्शन टीडीआर देणार असल्याचेही सूतोवाच फडणवीसांनी या कार्यक्रमात केले. ज्या ठिकाणी बिल्डर्स इमारती बांधतात, त्या भागात रस्ते आणि इतर सोयी देण्यासाठी अनेक वेळेला मनपाकडे निधी नसतो. त्यामुळे इमारती बांधताना बिल्डरने त्या भागात रस्तेही बांधले, तर त्या मोबदल्यात त्या बिल्डरला वाढीव टीडीआर देता येईल. त्यामुळे फ्लॅट बांधलेल्या भागात रस्तेही निर्माण होतील आणि मनपावरचा भारही कमी होईल, असेही फडणवीस म्हणाले.