वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन कल्याणराव काळेंची सत्ता कायम..
------------------------------------------------------------------------------------
निष्ठावंत माजी संचालक सोबत राहिल्याने विजय..!
------------------------------------------------------------------------------------
अभिजीत पाटील गटाचे कारखाना लढाईत मोठ्या प्रमाणात पानिपत, पाटलांचा फूगा फुटला.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कल्याणराव काळे पॅनेलने निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. विरोधक असलेल्या अभिजीत पाटील पॅनेलला खाते देखील उघडता आले नाही. किमान दिड हजार ते 1811 मतांनी सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे विठ्ठल परिवाराचा नेता कल्याणराव काळे हेच असल्याचे दाखवून दिले आहे. तर अभिजीत पाटील यांच्या राजकीय घोडदौडीला या निमित्ताने ब्रेक लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणाला कलाटणी मिळाली आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी या कारखाना निवडणुकीत अत्यंत चुरशीने 94.40 टक्के मतदान झाले होते. या मतमोजणी कडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. पंढरपूर येथील शासकीय धान्य गोडावून येथे सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता पहिल्या फेरीतच काळे गटाने आघाडी घेतली होती. दुसर्या फेरीतही काळे गटाची आघाडी कायम राहिल्याने अभिजीत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावरुन काढता पाय घेतला. तर निवडणुकीचा कल हाती येताच विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे हे भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांच्यासह मतदान केंद्रावर दाखल झाले. कार्यकत्यार्ंंनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
दरम्यान, मतदान केंद्राच्या बाहेर उभी असलेल्या विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या चारचाकी गाडीची काच काळे समर्थकांनी फोडली तर झालेल्या झटापटीत पाटील गटाचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचाराकरीता दवाखान्यात दाखल करण्यात आले.गाडीची काच फोडणे व कार्यकर्त्याला मारहाण करणे या प्रकरणी अभिजीत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशन येथे एकत्रित येत कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, ही निवडणूक सभासदांनी हातात घेतली होती. त्यामुळे सभासद हे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडले नाहीत. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याच्या दिशेने सहा महिन्यापासून त्यांचे अरेरावीचे राजकारण सुरु झाले होते. गाडीची काच फोड प्रकरण देखील अभिजीत पाटील यांचेच कटकारस्थानाचा भाग असेल. असे असल्याचे सांगत शेतकरी सभासदांचे ऊसाचा राहिलेले पैसे देण्यात येतील, त्याची कार्यवाही सुरु आहे. एकाही शेतकर्याचा पैसा थकीत राहणार नसल्याचे कल्याणराव काळे यानीं सांगीतले.
कल्याणराव काळे गटाला माजी आमदार प्रशांत परिचारक यांचाही पाठिंबा मिळाला. त्यमुळे या निवडणुकीत कल्याणराव काळे यांनी 1811 मतांनी विरोधकांचा पराभव केला. तर नागेश फाटे यांनी 1701 मते घेत विरोधकाचा पराभव केला तर भारत कोळेकर 1785 मतांनी तर अॅड.तानाजीराव सरदार यांनी 1508 मतांनी डॉ. बी.पी. रोंगे यांचा पराभव केला. अभिजीत पाटील गटाचे अॅड. दिपक पवार यांना 3878 मते मिळाली. अभिजीत पाटील गटाला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. त्यामुळे विठ्ठल बरोबर वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सुत्रे हाती घेण्याचे अभिजीत पाटील यांचे स्वप्न भंगले आहे. या दारूण पराभवामुळे अभिजीत पाटील यांच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागला असल्याचे चित्र दिसून येते.
{ विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे :-
भाळवणी गटातून : गोरख हरीबा जाधव (5569), युवराज छगन दगडे (5491), सुनिल वामन सराटे (5456), भंडीशेगाव गटातून : कल्याणराव वसंतराव काळे (5627), अमोल नवनाथ माने (5460), परमेश्वर हरिदास लामकाने (5441), गादेगाव गट : दिनकर नारायण कदम (5544), नागेश एकनाथ फाटे (5507), मोहन वसंतराव नागटिळक (5475), कासेगाव गटातून : योगेश दगडू ताड (5495), तानाजीराव उमराव सरदार (5416), जयसिंह बाळासाहेब देशमुख (5436), सरकोली गटातून : राजाराम खासेराव पाटील (5494), संतोषकुमार शिवाजी भोसले (5453), आण्णा गोरख शिंदे (5476), अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी : राजेंद्र भगवान शिंदे (5568), महिला राखीव प्रतिनिधी : संगीता सुरेश देठे (5521), उषाताई राजाराम माने (5383), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : अरुण नामदेव नलवडे (5543), भटक्या विमुक्त जाती जमाती : भारत सोपना कोळेकर (5661), संस्था मतदार संघातून मालन वसंतराव काळे (बिनविरोध) निवडणून आल्या आहेत.}