आरटीओ कार्यालयात स्वतःला कोंडून घेत ऊस दर संघर्ष समितीचे अनोखे आंदोलन

आरटीओ कार्यालयात स्वतःला कोंडून घेत ऊस दर संघर्ष समितीचे अनोखे आंदोलन

____________________________________________________

पंढरी- नगरी न्यूज : २८ ऑक्टोबर रोजी आरटीओ कार्यालयासमोर केलेले ठिय्या आंदोलन आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांसोबत केलेल्या चर्चेला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, ऊसदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी  स्वत:ला आरटीओ कार्यालयात  कोंडून ठेवले आहे.

सोलापूर आरटीओ कार्यालयात ऊसदर संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील अवैध ऊस वाहतूक रोखण्यात यावी. सोलापूर आरटीओ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रेलरवर कारवाई करावी, अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

स्वतःला कोंडून घेतले : २८ ऑक्टोबर रोजी आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या मागणीला यश आले नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही, म्हणून ऊस दर संघर्ष समितीचे पदाधिकारी सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आरटीओ कार्यालयात आले व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांसोबत चर्चा केली. चर्चेमध्ये काहीही सकारात्मक निर्णय न झाल्याने सर्व पदाधिकऱ्यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले आहे.

सोलापुरातील अवैध ऊस वाहतूक रोखण्याची मागणी : वाहतूक नियमानुसार ऊस वाहतूक केली जात नाही, एका ट्रॅक्टरच्या मागे दोन किंवा तीन ट्राली लावल्या जातात, त्या बेकायदेशीर आहेत. ही बेकायदेशीर ऊस वाहतूक रोखावी, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. साखर कारखान्याचे अनेक ट्रॅक्टर, ट्रक उसाची बेकायदेशीर व अवैध ऊस वाहतूक करतात. ही अवैध ऊस वाहतूक रोखावी अशी मागणी केली आहे.

जुजबी कारवाईचे नाटक : आरटीओ अधिकारी हे जुजबी कारवाई करतात आणि उलट वसुली करतात असा गंभीर आरोप ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे. जोपर्यंत आरटीओ कार्यालय सोलापूर जिल्ह्यातील अवैध ऊस वाहतूक रोखत नाहीत. तोपर्यंत दार उघडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.