मराठी भाषेचा अभिमान बाळगा- सहाय्यक कुलसचिव- डॉ. शिवाजी शिंदे

मराठी भाषेचा अभिमान बाळगा- सहाय्यक कुलसचिव- डॉ. शिवाजी शिंदे

------------------------------------------------------------------------------------
मराठी भाषा गौरव दिना निमित्त व्याख्यान विशेष
------------------------------------------------------------------------------------

सोलापूर  (दै.पंढरी नगरी न्यूज) : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  कार्यालय व हुतात्मा वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची जयंती "मराठी भाषा गौरव दिन"  व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण पुढाले नायब तहसिलदार सोलापूर तर व्याख्याते डॉ. शिवाजी शिंदे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर हे  होते.

 मूल जन्माला आल्यापासून भाषा शिकत असते, कुटूंब हे त्याचे भाषा शिकण्याचे पहिले व्यासपीठ असते, तर शाळा महाविद्यालयपासून त्यांची भाषा समृद्ध होत जाते. प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहीजे. पण त्याच बरोबर इतर भाषेचा दुराभिमान करू नये असे विचार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीने एखादा मराठी सिनेमा किंवा नाटक पाहीले पाहीजे, दैनंदिन व्यवहार मराठीतून केले पाहीजेत, बाजारपेठेतील फलक मराठीतून असले पाहिजेत, दैनदिन जीवनातील पत्रव्यवहार हा मराठीतून केला पाहिजे, भिलार या पुस्तकाच्या गावाला भेट दिली पाहिजे, जोंधळे आजीने चालू केलेल्या पुस्तकाच्या हॉटेल सारखे प्रयत्न इतरत्र झाले पाहिजेत एखादया कार्यक्रमास किंवा वाढदिवसा दिवशी पुस्तकांची भेट दिली पाहिजे अशा प्रयत्नातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.

या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कवि कुसुमाग्रज व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिक प्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृषाली हजारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार ग्रंथालय निरिक्षक प्रमोद पाटील यांनी मानले.