पंढरपुरात सोलापूर ग्रंथ उत्सवाचे ग्रंथदिंडीच्या जल्लोषात ग्रंथोत्सवाची भव्य सुरुवात
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) ढासळती मूल्यव्यवस्था, वाढता चंगळवाद आणि विवेकबुद्धीवर आलेली ग्लानी यामुळे समाज एका अंधाऱ्या गुंगीत जगत आहे. अशा काळात समाजाला योग्य दिशा देणारी शक्ती म्हणजे ग्रंथ आणि ग्रंथालये होय. त्यामुळे ग्रंथालये ही केवळ पुस्तकांची जागा न राहता समाजाच्या मूल्यसंस्कारांची मंदिरे बनली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या २०१० च्या सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि पंढरपूर तालुका ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रखुमाई सभागृहात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी भूषविले.
ग्रंथ म्हणजे विचारांचे अमृतकुंभ
पुढे बोलताना डॉ. पाटणे म्हणाले, ग्रंथ हे वाचन संस्कृतीचे अमृतकुंभ आहेत. ते माणसाच्या विचारांना दिशा देतात, जगण्याला बळ देतात आणि मनाला एक विलक्षण आनंद देतात. आज प्रचंडपणाच्या नादात माणूस साधेपणातील खरा आनंद गमावत चालला आहे. आजच्या काळात “सत्याचा विजय होतो का?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अनेकदा जो विजयी होतो त्यालाच सत्य म्हणावे लागते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी समाजाला सत्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी साहित्य आणि संतपरंपरेवर येते.
मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध असतो. हिंदी आणि इंग्रजी भाषेला विरोध नाही; त्या खिडक्या आहेत, मात्र मराठी ही आपल्या संस्कृतीचे महाद्वार आहे. आज व्यवहार खिडक्यांतून सुरू आहे आणि महाद्वार मात्र ओस पडत चालले आहे. मोबाईल नावाचे खेळणे हातात आल्यापासून समाजात विचारांचा दुष्काळ पडत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजाच्या प्रगतीसाठी वाचन संस्कृती आवश्यक – सावंत
अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले,समाजाच्या शाश्वत प्रगतीसाठी साहित्य, विचार आणि वाचन संस्कृती अत्यंत आवश्यक आहे. समाजात विचारांची चळवळ आणि संघटन वाढली पाहिजे. ग्रंथोत्सव हा केवळ उत्सव नसून समाजाला विचारांची ऊर्जा देणारा वैचारिक सोहळा आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि काळानुसार प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडत असते. माणसाला खऱ्या अर्थाने माणूसपण कधी येईल याचा शोध घ्यायचा असेल, तर ग्रंथ आणि संतपरंपरा अत्यंत महत्त्वाची ठरतात. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावात जगताना वाचनाची गरज अधिक वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जोतिराम गायकवाड, ग्रंथालय संघाचे संचालक साहेबराव शिंदे ,विनोद गायकवाड ,साहित्यिक गोपाळराव देशमुख, सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील ,संजय ढेरे ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, गुलाबराव पाटील, सिद्धार्थ ढवळे, कल्याण शिंदे, प्रमोद पाटील, संजय ढेरे, प्रदीप गाडे, मच्छिंद्र लेंडवे सर, प्रकाश शिंदे, विठ्ठल पाटील, विनोद गायकवाड, तानाजी जाधव, फुलचंद नागटिळक, प्रशांत जाधव, सुनील नागणे (सर ) सुरेश शिंदे, दिलीप भोसले ,विनायक गुरव ,हुसेन मुलाणी, कृष्णदेव मदने, राजेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर तालुका ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल हुसे यांनी केले. जोतिराम गायकवाड यांनी ग्रंथोत्सवाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अंकुश गाजरे यांनी सूत्रसंचालन केले, तर अन्सर शेख यांनी आभार मानले.
ग्रंथदिंडीने पंढरपूरकरांचे लक्ष वेधले
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने संपूर्ण पंढरपूरचे लक्ष वेधून घेतले.
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला.
प्रांताधिकारी सचिन इथापे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी ग्रंथपालखी खांद्यावर घेत ती रखुमाई सभागृहात आणली.
या दिंडीत जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था, कवठेकर प्रशाला आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथील विद्यार्थी सहभागी झाले. ‘पालवी’ सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने दिंडीला विशेष रंगत आणली. टाळ-मृदंगांच्या गजरात आणि फुगड्यांच्या उत्साहात निघालेल्या या ग्रंथदिंडीने पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
परिसंवाद आणि कविसंमेलन
दुपारच्या सत्रात ‘मराठी भाषा संवर्धन’ या विषयावर प्रा. डॉ. रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला.
यावेळी प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर, डॉ. शिवाजी शिंदे आणि डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर झालेल्या कविसंमेलनात शिवाजी बंडगर, लता ऐवळे, इंदजीत घुले, शिवाजी सातपुते, लक्ष्मण हेंबाडे, गजानन गायकवाड, संभाजी अडगळे, सुनिल जवंजाळ आदी कवींनी आपल्या कवितांनी रसिकांची दाद मिळवली.